Dnamarathi.com

Amit Shah : केंद्रीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर करणार आहे मात्र त्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. 

आगामी निवडणुका लक्षात घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व विरोधी पक्षांना आणि विशेषतः काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. 

 आगामी लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपाने 370 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे यासाठी आता पक्षातील दिग्गज नेत्यांकडून  वातावरण निर्मितीसाठी सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. शाह म्हणाले की, निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) देशभरात लागू केला जाईल.

काय म्हणाले अमित शहा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका टीव्ही चॅनलच्या समिटमध्ये ही माहिती दिली. येत्या दोन ते तीन महिन्यांत म्हणजेच एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधी शाह यांनी दिलेल्या या वक्तव्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

अमित शाह म्हणाले, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व हिरावून घेणार नाही. धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्याकांनाच नागरिकत्व देणे हा त्याचा उद्देश आहे. मुळात काँग्रेसने त्यांना हे वचन दिले होते.

विरोधकांवर टीका

विरोधक देशातील मुस्लिमांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. ते म्हणाले, “या कायद्याबाबत आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना चिथावणी दिली जात आहे. हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *