Dnamarathi.com

Pune News :  पुण्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. आळंदी-मरकल रोडवरील सोलू गावात एका खासगी कंपनीत भीषण स्फोट झाला. 

या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, कंपनी घरे आणि दुकाने असलेल्या निवासी भागाजवळ आहे. त्यामुळे कंपनीत भीषण स्फोट झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली.

विजेच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नंतर तपासात समोर आले की, ट्रान्सफॉर्मरचा प्रथम स्फोट झाला नसून, बंद कंपनीत ठेवलेल्या केमिकलमुळे आग पसरली.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सोलू गावात असलेल्या स्पेसिफिक अलॉयज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली.

 माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका आणि आळंदी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

सुरुवातीला बंद पडलेल्या मेटल युनिटजवळील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग आवारात पसरली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) चा आहे. मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाला नसल्याचे पोलिस व महावितरणने स्पष्ट केले.

कंपनीच्या आवारात स्फोट झाल्यामुळे आग ट्रान्सफॉर्मरसह इतर ठिकाणी पसरल्याचे तपासात समोर आले आहे. या अपघातात आठ जण भाजले, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जनावरे जखमीही झाली आहेत.

जखमींना उपचारासाठी पुणे शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट कशामुळे झाला आणि कोणत्या चुका झाल्या याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *