Suresh Dhas : 14 जून 2024 वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, 14 जून 2024 वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली आणि त्यावेळी धनंजय मुंडे यांचे पीए जोशी त्यांच्या माध्यमातून अवादा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्याबोरबर संधान साधत होते परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचे वाल्मिक कराड यांनी काम बंद पाडले. तसेच धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली गेली त्यापैकी दोन कोटींच्या खंडणीची डील झाली असल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला.
पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज आहे, पोलिसांनी त्याला पकडले तर यातील बरेचसे राज बाहेर येईल आणि 50 लाख रुपये निवडणूक काळात यांनी त्या कंपनीकडून घेतले, उर्वरीत दीड कोटीच्या मागणीसाठी गेले तेव्हा वॉचमनला मारले तेव्हा संतोष देशमुख तिथे मध्ये गेला आणि त्यांचा अमानवीय कृत्य करुन मर्डर केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नितीन कुलकर्णी नावाचा आका वाल्मिक कराड यांचा पीए आहे तो 17 मोबाईल नंबर वापरतो, नितीन कुलकर्णीला अटक करुन 17 मोबाईल जप्त करा अशी मागणी देखील माध्यमांशी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.