DNA मराठी

Arun Munde : पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आले असून, पक्षातील दोन गटांत वाढता संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सध्या पक्षाचे सरचिटणीस असलेले अरुण मुंडे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी तसेच गोकुळ दौंड यांनी मेळावे घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, भाजपने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांनाच संधी दिली.

या पार्श्वभूमीवर, नुकत्याच झालेल्या शेवगाव शहरातील ‘देवाभाऊ कुस्ती स्पर्धा’ला अरुण मुंडे यांनी संयोजन दिलं. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, यामध्ये भाजपातील अंतर्गत मतभेद अधोरेखित झाले. या कार्यक्रमाच्या बक्षीसवाटप समारंभाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी महसूल मंत्री व जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांनी उपस्थिती लावली. मात्र, जिल्ह्यातील इतर भाजप आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, हे विशेष.

या कार्यक्रमाला भाजपमधील काही नेत्यांनी उपस्थित राहू नये यासाठी खुद्द आमदार मोनिका राजळे यांच्या गटाकडून प्रयत्न झाल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. सोशल मीडियावरही अशाच आशयाची पोस्ट फिरत होती, ज्यामध्ये “पक्षविरोधात काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते हजर का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

विशेष म्हणजे, व्यासपीठावरून बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “या कार्यक्रमाला येण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न केले, त्यामुळे उपस्थित राहणं शक्य झालं,” असं स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यानेही अनेकांचे भुवया उंचावल्या.

यानंतर, पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात भाजपच्या गटबाजीने पुन्हा डोके वर काढले आहे का, हे स्पष्ट होत आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही फूट आणखी गडद होणार की पक्ष नेमकी भूमिका घेऊन तोडगा काढणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *