Ambernath Crime: अंबरनाथ जावसई परिसरात एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीने तलवार-कोयत्यांसारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
फुलेनगर वाडीतील सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि परिसरात त्यांचा तबेलाही आहे. गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असताना अचानक मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला.
आरोपींकडे तलवार, कोयता यांसारखी घातक हत्यारे होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या हल्ल्यात सुधीर सिंह यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोरांनी पळ काढताना पीडिताची मोटरसायकलसुद्धा फोडून टाकली.
संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आली आहे.या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध तीव्र केला आहे.
शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये मोठी भयभीतता पसरली आहे.






