Dnamarathi.com

Ahmednagar News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुरोगामी विचार आणि सर्व समाज घटकांना एकत्रित बांधण्याचे विचार महाराष्ट्राला तसेच देशाला माहिती आहेत.‌ माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी मागील 45 वर्षांपासून याच विचारांशी एकनिष्ठ राहून शरद पवार यांना साथ दिली आहे. 

 त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगरमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी, रिपाइं अशा सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरमधील स्थानिक राजकारणाबाबत एक ज्येष्ठ आणि प्रगल्भ विचारांचे नेते म्हणून दादाभाऊ कळमकर यांनी काही भूमिका मांडली.

 त्याचा विपर्यास करून कॉंग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ज्यांना अजिबात जनाधार नाही अशा पदाधिकाऱ्यांनी कळमकर यांच्या विषयी पूर्णतः चुकीचे आणि हेतूपुरस्सर गैरसमज निर्माण करणारी भूमिका मांडली.

 भाजपच्या विचारसरणीशी कळमकर कधीही जुळवून घेणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. अशा वेळी केवळ सनसनाटी निर्माण करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने कळमकर यांच्या विषयी चुकीचे पत्रक काढण्यात आहे. त्यांच्या भूमिकेवर कोणीही विश्वास ठेवणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शेख आरीफ पटेल यांनी व्यक्त केले आहे.

शेख आरीफ पटेल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांमुळे प्रगल्भता आलेली आहे. त्यामुळे राजकीय अथवा वैचारिक विरोधक असला तरी वैयक्तिक पातळीवर एकमेकांशी संवाद, सलोखा कायम राखला जातो. हीच परंपरा आदरणीय दादाभाऊ कळमकर यांनी कायम जतन केली आहे. भाजप काय किंवा कोणत्याही विरोधी पक्षाचे नेते, पदाधिकारी असो दादांनी नेहमीच वैयक्तिक स्तरावर चांगले संबंध ठेवले आहेत व अभिषेक कळमकर सुध्दा तेच तत्व पाळत आहे. दादांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन केले. त्यावेळी त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार काही भूमिका मांडली.

त्याचा विपर्यास करण्याचं काहीच कारण नाही. परंतु सध्या सनसनाटी वक्तव्य करीत काही जण माध्यमातून हेडलाईन मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. यातून त्यांच्या अर्धवट अभ्यासाची आणि बालिश बुद्वीची प्रचिती येते. आरोप करताना त्यांनी आपल्या राजकीय कोलांट्या उड्यांचा इतिहास तरी आठवायचा. दादाभाऊ कळमकर यांच्या राजकीय, सामाजिक कार्यकीर्दीचि इतिहास पाहिला तर ते कदापिही चुकीच्या विचारसरणीशी तडजोड करणार नाही, हे सर्व समाज घटकांना चांगले माहीत आहे.

त्यामुळे त्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण करून स्वतः चमकोगिरी करणारांनी आधी आरशात पाहून स्वतःच्या निष्ठा कुठं कुठं वाहिल्या हे पाहावे अशी टीका शेख आरीफ पटेल यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *