Dnamarathi.com

Aurangabad News: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगरातील बनकरवाडी येथे 12 ते 14 वर्षे वयोगटातील चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 ही दुर्दैवी घटना काल सायंकाळी सातच्या सुमारास घडली. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (वय-12 वर्षे), अबरार जावेद शेख (वय-12 वर्षे), अफरोज जावेद शेख (वय-14 वर्षे), कुणाल अनिल दळवी (वय-13 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मुले गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर भागातील रहिवासी आहेत.  दुपारी सर्वजण पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत मुले घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी त्यांना मुले पाझर तलावावर गेल्याचे समजले.

त्याचे आई-वडील तेथे गेले असता तलावाच्या काठावर कपडे व मोबाईल आढळून आले. मात्र मुले सापडली नाहीत. चारही मुले खोलात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अबरार आणि अफरोज हे सखे भाऊ होते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने चार मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. पोलिसांनी मुलांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात नेले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *