Dnamarathi.com

Ahmednagar Accident: राज्यात कालरात्री पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एक महिला जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नगर – पुणे- कल्याण महामार्गावर डिंगोरे परिसरात तीन वाहनांच्या धडकेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.

 मृतांमध्ये दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे परिसरातील अंजिराची बाग येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात माळशेज घाटाजवळील मढ गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. 

अपघातग्रस्ताचे कुटुंब जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे नातेवाइकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते व रात्री उशिरा घरी परतत होते. गणेश मस्करे (वय 30), कोमल मस्करे (वय 25), हर्षद मस्करे (वय 4), काव्या मस्करे (वय 6) अशी मृतांची नावे आहेत.

तीन वाहनांची धडक… कुटुंब उद्ध्वस्त

गणेश मस्करे हा भाजीविक्रीचा व्यवसाय करायचा. त्यामुळेच तो पिकअपमध्ये भाजीपालाही भरून आणत होता. कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी जात होता.

 पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मस्करे हे आळेफाटा येथून भाजीपाला घेऊन पिकअपने ओतूरहून कल्याणच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाने पिकअपला धडक दिली.

या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. चालक आणि मस्करे कुटुंब पिकअपच्या केबिनमध्ये बसले होते आणि मागे एक कुली बसला होता. 

रिक्षाला धडकल्यानंतर पिकअपची कल्याणकडून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. त्यामुळे पिकअपमधील 5 पुरुष, 1 महिला आणि दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला.

कारवर टेम्पो उलटला

पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यांच्या कारवर टेम्पो उलटल्याने चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळ हा अपघात झाला.

समोरून येणाऱ्या कारवर भरधाव वेगात असलेला टेम्पो पलटी झाल्याने कारमधील चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर एक महिला थोडक्यात बचावली. या अपघातात सुनील धारणकर (वय 65 वर्षे), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्षे), आशा सुनील धारणकर (वय 42 वर्षे) आणि अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला.

पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा टेम्पो एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की टोयोटा इटिओस कारचा चक्काचूर झाला. 

या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून तातडीने मदतकार्य सुरू केले, त्यामुळे महिलेचा जीव वाचला. मात्र या अपघातात अकोले तालुक्यातील एका दोन वर्षाच्या चिमुरडीसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *