Dnamarathi.com

IMD Weather News:  दक्षिण भारतात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रामध्ये देखील झपाट्याने वातावरण बदलताना दिसत आहे. 

बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यातील बहुतेक भागात थंडीची तीव्रता वाढली आहे. अहमदनगर, मुंबई, पुणेसह राज्यातील इतर भागात पारा घसरल्याने थंडी जाणवू लागली आहे. 

 आठवड्याच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंड वाऱ्यांनी प्रवेश केल्याने पारा सामान्यापेक्षा खाली घसरला. मात्र, दोन दिवसांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर 20 डिसेंबरनंतर किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून तापमानात आणखी 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. वास्तविक उत्तर भारतातून थंड वारे महाराष्ट्रात पोहोचत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात आता किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. मात्र नवीन हवामान प्रणालीमुळे पारा चढण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने काय म्हटले?

IMD (पुणे) च्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांच्या म्हणण्यानुसार, 18 डिसेंबरपासून काही दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. या आठवडय़ात किमान तापमानात चढ-उतार दिसून येतील, परंतु 18-20 डिसेंबरच्या सुमारास राज्यातील रात्रीचे तापमान सामान्यापेक्षा किंचित कमी राहील. यानंतर रात्रीच्या तापमानात पुन्हा किंचित वाढ होऊ शकते.

थंडी कमी होईल!

IMD च्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यांत उत्तर-मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील. मात्र, या काळात राज्यातील उर्वरित भागात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहू शकते. 20 ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यात उत्तरेकडील वारे वाहू लागतील, त्यामुळे किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. वास्तविक हे थंड वारे पश्चिम हिमालय आणि उत्तर-पश्चिम भारताच्या थंड प्रदेशातून येत आहेत.

पाऊस का पडू शकतो?

दुसरीकडे, हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुढील काही आठवडे अंतर्गत महाराष्ट्रातील किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त आणि विदर्भ आणि मराठवाड्यात सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

वाऱ्याची दिशा बदलल्याने राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार आहे. ओलसर आग्नेय-पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात आजपासून 20 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि किमान तापमानात वाढ होईल. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्येही गुलाबी थंडी कमी होणार आहे. या आर्द्रतेमुळे पुण्यासह दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक सरी पडू शकतात.

राज्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी कमी असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *