Ahilyanagar Politics : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिले आहे. त्यामुळे तिरंगी झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे आता अहिल्यानगर शहरातील राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार प्रभाग क्रमांक 17 मधील मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहे.
राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहे.केडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही उमेदवारांचा गेल्या चोवीस तासांपासून कुटुंबाशी संपर्क नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली आहे.
दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भाजप आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर निवडणुकीला उभा होता. तसेच
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याचा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केला आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.





