Ahilyanagar News : सावेडी परिसरातील तब्बल 35 वर्षांपूर्वीचा जमीन व्यवहार सध्या संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. सर्वे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीची नोंद इतक्या वर्षांनी तलाठी कार्यालयात झाली असून, त्यामुळे भू-माफिया, शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि राजकीय वरदहस्ताचे धागेदोरे समोर येत आहेत.
ही जमीन मूळत: अब्दुल अजीज डायाभाई (मूळ पत्ता – झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य मुंबई) यांच्या नावावर होती. 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांना ही जमीन खरेदीखताद्वारे विकली गेली होती. मात्र इतक्या वर्षांनंतर अचानक नोंद घेताना मूळ मालकाला कोणतीही नोटीस दिली न गेल्याने आणि मूळ खरेदीखताची प्रत न तपासता नोंदणी झाल्याने प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे.
या प्रकारामुळे बाहेरगावी गेलेल्या किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील जमिनी हडप करण्याचा डाव अधिकाऱ्यांच्या संगनमताने रचला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
यात लाखोंच्या उलाढाली, अधिकाऱ्यांना मिळणारे मोठे आर्थिक फायदे आणि वरून मिळणारे राजकीय संरक्षण यामुळे असे प्रकार सर्रास घडत असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शासकीय यंत्रणेतील अशा भ्रष्ट कारभाराला लगाम घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.
सावेडी जमीन व्यवहार : 35 वर्षांनंतर नोंदणीचा गोंधळ
जमिनीचा तपशील
सर्वे नं. : 245/ब 1 (0.72 हेक्टर आर)
सर्वे नं. : 245/ब 2 (0.63 हेक्टर आर)
एकूण क्षेत्रफळ: 1 हेक्टर 35 आर
मूळ मालक : अब्दुल अजीज डायाभाई (सध्या मुंबईत वास्तव्य)
खरेदीदार : पारसमल मश्रीमल शहा
खरेदीखत दिनांक : 15 ऑक्टोबर 1991
संशयास्पद बाबी
तब्बल 35 वर्षांनंतर नोंदणी
मूळ मालकास नोटीस न देता नोंद
मूळ खरेदीखताची प्रत न तपासता नोंद
तलाठी कार्यालयाच्या कारभारावर संशय