DNA मराठी

adulterated milk “आरोग्याशी खेळ, सत्तेची ढाल – दोषींना संरक्षण कोण देतं?”  

adulterated milk
लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी त्याचा थेट संबंध आहे. आणि अशा मूलभूत अन्नघटकामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक रसायने आणि पावडर मिसळून विक्रीस टाकले जाणे, हा केवळ अप्रामाणिक व्यवसाय नाही, तर तो उघडपणे हत्या करण्यासारखा गुन्हा आहे.

adulterated milk – Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील दूध संकलन केंद्रांमध्ये सुरू असलेला भेसळीचा उद्योग आणि त्यामागे असलेला राजकीय वरदहस्त हा केवळ एक स्थानिक गैरप्रकार नाही, तर ही आपल्या व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या अनास्थेची आणि नैतिक दिवाळखोरीची स्पष्ट साक्ष आहे. दूधासारखा नितळ आणि पवित्र मानला जाणारा अन्नघटक जर विषारी बनवून बाजारात विकला जात असेल, तर हे केवळ एक आर्थिक घोटाळा नाही, तर मानवी आरोग्यावर, विशेषतः बालकांवर केलेले अक्षम्य अपराध आहे.


धायतडकवाडी येथील संत वामनभाऊ दूध संकलन केंद्राच्या नावाने चालवला जाणारा हा बनावट व्यवहार केवळ भेसळीतच मर्यादित नाही. येथे शासनाच्या दूध पूरक प्रोत्साहन योजनेंतर्गत लाखो रुपयांचे अनुदान उचलून, प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली दुधाळ जनावरे दाखवून शासनाची फसवणूक झाली आहे. हे प्रकरण ज्या पद्धतीने उघडकीस आले, त्यावरून स्पष्ट होते की, यामागे एक संगनमत आहे आणि याला स्थानिक मोठ्या राजकारण्यांचे संरक्षण लाभले आहे.


या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना ‘कारवाई करू नका’ असा आदेश स्थानिक मोठ्या नेत्याने दिला. ही घटना लोकशाहीसाठी आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेसाठी गंभीर इशारा आहे. प्रशासन जर एखाद्या मंत्र्याच्या किंवा स्थानिक नेत्याच्या दबावाखाली काम करत असेल, तर मग सामान्य जनतेचा काय?

दूध हा आपल्या घराघरात दररोज वापरला जाणारा अत्यावश्यक घटक. लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याशी त्याचा थेट संबंध आहे. आणि अशा मूलभूत अन्नघटकामध्ये स्टार्च, साबण, सिंथेटिक रसायने आणि पावडर मिसळून विक्रीस टाकले जाणे, हा केवळ अप्रामाणिक व्यवसाय नाही, तर तो उघडपणे हत्या करण्यासारखा गुन्हा आहे.


या प्रकरणात अमोल सखाराम धायतडक यांच्यावर झालेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे प्रत्यक्षात कोणतीही दुधाळ जनावरे नसताना, त्यांनी बनावट संकलन केंद्राच्या नावाखाली व्यवसाय उभा करून जनतेला विषारी दूध विकले आहे. हे दूध म्हणजे एका अर्थाने विषाचे घोट होते जे आपण आपल्या मुलांच्या हातात दिले.


प्रश्न इतकाच आहे ही माहिती सरकारदरबारी पोहोचल्यावर खरोखर दोषींवर कारवाई होईल का? की या प्रकरणाची फाईलसुद्धा राजकीय दबावात गारद होईल? कारण ही केवळ एक घटनेची नव्हे, तर व्यवस्थेच्या भ्रष्ट पायाभरणीची कथा आहे.


हा प्रकार आरोग्याच्या आणि नैतिकतेच्या दोन्ही आघाड्यांवर गंभीर धोका आहे. आज पाथर्डी, उद्या कोण? जर या विषारी धंद्यांना वेळेत आवर घातला नाही, तर शासन आणि प्रशासनाची विश्वासार्हता पार खिळखिळी होईल.

दूधभेसळीप्रकरणी केवळ पोलिस चौकशी नव्हे, तर अन्न व औषध प्रशासन, दुग्धविकास विभाग, आणि लोकायुक्त यांची संयुक्त समिती नेमून सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
शेवटी, दूध विकण्याचा व्यवसाय म्हणजे सेवा आणि ती सेवा विषारी बनवणाऱ्यांसाठी कारागृह हेच योग्य ठिकाण आहे. आणि या सर्व प्रक्रियेला राजकीय वरदहस्त असेल, तर मग समाजानेच निर्धार करून, अशा नेत्यांना जनादेशातून दूर ठेवायला हवे.