Imtiaz jaleel : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा चर्चेत आला आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
अहिल्यानगर महानगर पालिकेतील माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची साथ सोडत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षात दाखल होणार आहे.
माजी नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
माजी नगरसेवक समद खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेत एमआयएममध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील महिन्यात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेत एका विशेष समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज असून एआयएमआयएममध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा आता नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एआयएमआयएमला नगर शहरात मोठी ताकद मिळत असून पुढील काही दिवसात आणखी काही नेते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याचा विश्वास एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी व्यक्त केला आहे.