Hit And Run Law : केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याचा देशभरात विरोध करण्यात आला होता. त्यामूळे केंद्र शासनाच्या वतीने तूर्तास हा कायदा लागू होणार नाही अशी घोषणा केल्यानंतर चालकांनी संप मागे घेतला होता.
मात्र आता पुन्हा केंद्र शासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आज बुधवार 10 जानेवारी पासून पुन्हा ‘स्टेअरिंग छोडो’ आंदोलन करत साखळी उपोषणाला सुरू करण्यात आली आहे.
गोरेगाव तहसिल कार्यालयाच्या पुढे आज बुधवारी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने वाहन चालकांच्या विरोधात लागू केलेले हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलन व साखळी उपोषण पुकारलेले आहे.
अपघात झाल्यावर वाहन चालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कायद्याची तरतूद करा ,हीट अँड रन कायदा रद्द करा, वाहन सुरक्षा कायदा त्वरित लागू करा, इत्यादी मागण्यांना घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे.
आंदोलनाला जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक बिसेन विदर्भ मीडिया प्रमुख सुरेश गोंधर्य गोंदिया जिल्हा संघटक रवी पटले, जिल्हा सचिव राजेश ठाकरे गोरेगाव तालुका जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष विजय बळगे तालुका उपाध्यक्ष प्रीतीलाल बिसेन, तालुका सचिव भुमेश्वर गाते ,मयुर नदेश्वर, भारत डोंगरे, खेतराम खोब्रागडे, मुन्ना पटले,दिनेश डोहळे, अभिजीत मेश्राम, उमेश फुन्ने, विवेक शहारे, नितीन दमाहे आदी उपस्थित होते. या आंदोलनाला तालुक्यातील 500 वाहन चालकांनी समर्थन दिले आहे.