DNA मराठी

Ahilyanagar Police: अहिल्यानगरातील घरफोडीचे दोन गुन्हे उघड; हिंगोलीच्या आरोपीला अटक, 3.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

img 20261125 wa0007

Ahilyanagar Police : अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी हिंगोली येथील एका आरोपीला ट्रान्सफर वॉरंटवर ताब्यात घेत अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ लाख ८० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काय होती घटना?

१२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:४५ ते सायंकाळी ६:१५ दरम्यान पाईपलाईन रोडवरील बायजाबाई सोसायटी येथील फिर्यादी बाळासाहेब रेवाजी पवार (वय ५५, धंदा कंत्राक्शन) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. त्यांनी लोखंडी कपाटातील लॉकरमधून १,५७,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, तसेच घरामागे राहणारे अमोल सूर्यकांत झेंडे यांचे १,८२,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३,२९,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या प्रकरणी फिर्यादी राजश्री प्रमोद रसाळ यांचीही घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली होती.

तांत्रिक तपासातून आरोपी निष्पन्न व अटक

दोन्ही गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर मुद्देमाल व आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हे गुन्हे अजय महावीर भुक्तर (रा. सिद्धार्थनगर, दूध डेअरीसमोर, हिंगोली, जि. हिंगोली) याने केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीचा शोध सुरू असतानाच तो जवाहर नगर पोलीस ठाणे येथे घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ट्रान्सफर वॉरंट घेऊन त्याला तोफखाना पोलीस ठाण्याच्या गु.र.नं. ९४५/२०२६ मध्ये अटक केली.

3.80 लाखांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस कोठडीत सखोल चौकशी केली असता आरोपीने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये ३,८०,५०० रुपये किमतीचे सुमारे ४ तोळे वजनाचे सोन्याचे तीन लगड हस्तगत करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, सपोनि कल्पना चव्हाण, सफौ तन्वीर शेख, पोहेकाँ गोरख काळे, नितीन उगलमुगले, दिपक गांगर्डे, पोकाँ विशाल कुलकर्णी, अमोल गाडे आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *