DNA मराठी

Pratapsingh Patil : मराठवाडा पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील विजयी; पहाटे प्रशासनाकडून अधिकृत घोषणा

pratapsingh patil

Pratapsingh Patil : विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी १८ हजार १२४ मतांनी विजय मिळवला. त्यांना ८५ हजार ८७६ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी गुरुवारी (२९ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी डॉ. पाटील यांना विजयी घोषित करून विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले. भारत निवडणूक आयोगाकडून निकालासंदर्भातील पुढील प्रक्रियेला मान्यता मिळाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे मतमोजणी पार पडली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण ४१ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीच्या प्रारंभी मतपत्रिकांची पडताळणी व वर्गीकरण करून पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी तीन फेऱ्यांत पूर्ण करण्यात आली. एकूण १ लाख ७७ हजार ११५ मते वैध, तर १६ हजार ५४० मते अवैध ठरली. वैध मतांच्या आधारे विजयासाठी ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ७३ हजार ९३१, सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८, अपक्ष उमेदवार रविराज उर्फ अण्णासाहेब सावळे-पाटील यांना १९ हजार ८३५, तर दिलीप घुगे यांना ८ हजार ४३९ मते मिळाली. मात्र, कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा गाठता आला नाही. त्यामुळे निवडणूक नियमांनुसार कमी मते मिळालेल्या उमेदवारांना टप्प्याटप्प्याने वगळून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार मतहस्तांतरण करण्यात आले. एकूण ४१ उमेदवारांपैकी ३९ उमेदवार वगळल्यानंतर डॉ. पाटील आणि सतीश चव्हाण हे दोन उमेदवार शिल्लक राहिले.

अंतिम मतमोजणीत डॉ. पाटील यांनी ८५ हजार ८७६, तर चव्हाण यांनी ६७ हजार ७५२ मते मिळवली. निर्धारित कोटा पूर्ण न करताही अंतिम मतमोजणीत सर्वाधिक मते मिळाल्याने डॉ. पाटील विजयी ठरले.

या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता सुरू झाली आणि गुरुवारी पहाटे अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत सलग ४५ तासांहून अधिक काळ सुरू होती. मतपत्रिकांची पडताळणी, वर्गीकरण, उमेदवारांची वगळणी, मतहस्तांतरण आणि अंतिम आकडेवारीची तपासणी अशा विविध प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत आणि निवडणूक निरीक्षक माधवी खोडे-चवरे यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *