Ketan Agarwal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अटकेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक केली आहे. रितेश हांगे नवाचा (वय २३, रा. लोणावळा ग्रामीण) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश हा चेतन चौधरीचा मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रितेशला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या तपासाबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) संदीपसिंग गिल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पोलिसांच्या तपासानुसार, चेतन, सिया आणि रितेश यांच्यात मैत्री होती. केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी झालेल्या नियोजनाची माहिती रितेशला होती. व्हॉट्सॲपवरील संदेश आणि इतर पुराव्यांच्या आधारे रितेशचा या प्रकरणात सक्रिय सहभाग असल्याचे समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली.
केतन अग्रवालची हत्या करण्यासाठी सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट किलिंगची योजना आखण्यात आली होती. मात्र, नंतर हा प्लॅन बदलण्यात आला आणि चेतन, सिया आणि रितेश यांनी स्वतःच केतनची हत्या करण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. सध्या तरी अन्य कोणतीही व्यक्ती तपासात समोर आलेली नसल्याचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्पष्ट केले. रितेशकडून मिळणाऱ्या माहितीतून हत्येच्या कटातील आणखी बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.






