DNA मराठी

Maharashtra Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’

rain

Maharashtra Rain Alert: भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात १८ व १९ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तविल्याने जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यास भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी यांनी केले आहे.

१७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता दौंड पुलाजवळ भीमा नदीत ३,४७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यास किंवा धरणांमधून पाणी सोडल्यास भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

नदी, ओढे वा नाल्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. धरण व नदी परिसरात जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्रे काढू नयेत.

मेघगर्जना होताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडांखाली, मोकळ्या मैदानात, टॉवर, ध्वजाचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण वा विद्युत रोहित्राजवळ थांबू नये. लोंबकळणाऱ्या तारांपासून दूर राहावे. विजा चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. तसेच ट्रॅक्टर, शेतीची अवजारे व दुचाकींपासून दूर राहावे. जाहिरात फलक कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी फलकांच्या आजूबाजूला थांबू नये.

विजा चमकत असताना उघड्यावर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये ठेवावे, जेणेकरून जमिनीशी कमीत कमी संपर्क राहील.

अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी जावे. तसेच घाट रस्त्याने प्रवास करणे टाळावे. जुनाट वा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज व पाऊस यांपासून स्वतःचे तसेच जनावरांचे रक्षण करावे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्याशी, तहसील कार्यालयाशी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, ११२ किंवा १०७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *