DNA मराठी

Donald Trump: 23 वर्षांनंतर इराकमधून अमेरिकन सैन्याची माघार; ट्रम्प यांची मोठी घोषणा

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकमधील अमेरिकन लष्करी मोहिमेला पूर्णविराम देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, सप्टेंबरअखेरपर्यंत अमेरिकेचे उर्वरित सर्व सैनिक इराकमधून माघारी बोलावले जाणार आहेत. 2003 मध्ये सद्दाम हुसेन यांच्या राजवटीविरोधात सुरू झालेल्या लष्करी कारवाईनंतर तब्बल 23 वर्षांनी अमेरिकेची इराकमधील सैन्य उपस्थिती संपुष्टात येणार आहे.

व्हाईट हाऊसमध्ये इराकचे पंतप्रधान अली अल-झैदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. “इराकमध्ये आता अमेरिकन सैन्याची गरज उरलेली नाही. दोन्ही देशांतील संबंध आता आर्थिक आणि विकासात्मक सहकार्यावर आधारित असतील,” असे ट्रम्प यांनी सांगितले. इराकचे पंतप्रधानांनीही 30 सप्टेंबरपर्यंत सर्व अमेरिकन सैनिक देशाबाहेर जातील, मात्र अमेरिकन कंपन्या इराकमध्ये कार्यरत राहतील, असे स्पष्ट केले.

अमेरिकेने 2003 मध्ये इराकवर आक्रमण करून सद्दाम हुसेन यांची सत्ता उलथवून टाकली होती. त्यानंतर दहशतवादविरोधी कारवाया, इस्लामिक स्टेट (ISIS) विरोधातील मोहिमा आणि इराकी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकन सैन्य दीर्घकाळ तैनात होते.

2024 मध्ये झालेल्या अमेरिका-इराक करारानुसार सैन्याची टप्प्याटप्प्याने माघार सुरू झाली होती आणि आता ती पूर्ण होणार आहे. सध्या उर्वरित अमेरिकन सैनिक मुख्यत्वे सल्लागार आणि प्रशिक्षणाच्या भूमिकेत कार्यरत आहेत.

या निर्णयामुळे मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी धोरणात मोठा बदल होणार असून, अमेरिका आणि इराक यांच्यातील संबंध आता प्रामुख्याने आर्थिक, ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रांवर केंद्रित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *