Jayden Adams : फुटबॉल विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) युवा फुटबॉलर जेडन अॅडम्स (Jayden Adams) याचे वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे. ॲडम्सने नुकतेच ‘बाफाना बाफाना’ (दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय संघ) कडून फिफा (FIFA) विश्वचषकात खेळण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले होते. त्याच्या निधनामुळे चाहते, सहकारी खेळाडू यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
क्लब फुटबॉलमध्ये (Club Football) जेडेन ॲडम्सने क्लब फुटबॉलमध्ये ‘ममेलोडी सनडाउन्स’साठी (Mamelodi Sundowns) उत्कृष्ट कामगिरी केली होती. संघाला ‘सीएएफ (CAF) चॅम्पियन्स लीग’चे विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक संघात स्थान मिळाले. विश्वचषकादरम्यानही त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेने बाद फेरीत (नॉकआउट स्टेज) धडक मारून इतिहास रचला होता, परंतू ‘राउंड ऑफ ३२’ मध्ये कॅनडाविरुद्धच्या (Canada) सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.
जेडेन याचे मार्गदर्शक ब्रेंडिन जॉन्सन यांच्या मते, विश्वचषकातून (World Cup 2026) परतल्यानंतर ॲडम्स खूप आनंदी होता आणि आगामी हंगामासाठी खुप उत्सुक होता. ‘सीएएफ’ चॅम्पियन बनल्यानंतर तो आपल्या कारकिर्दीच्या पुढील टप्प्यासाठी तयारी करत होता. जॉन्सन म्हणाले, “गुरुवारी माझी त्याच्याशी दीर्घ चर्चा झाली होती. विश्वचषकातून परतल्यानंतर तो खूप सकारात्मक होता. त्याला माहित होते की त्याच्यासमोर अनेक मोठ्या संधी आहेत. तो फुटबॉलसाठी पूर्णपणे समर्पित होता. झेकियाविरुद्धच्या गट सामन्यात दोन आठवडे आधी त्याच्या आजीचे निधन झाले होते. या दुःखाच्या प्रसंगातही तो देशासाठी मैदानात उतरला”.
जेडेन याच्या म़त्यूचे कारण अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही. मात्र त्याच्या अचाकन जाण्याने केवळ दक्षिण आफ्रिकेलाच नव्हे तर फुटबॉल विश्वालादेखील मोठा धक्का बसला आहे.त्याने कमी वयात फुटबॉल खेळामध्ये केलेली कामगिरी फुटबॉलप्रेमी कायम लक्षात ठेवतील.






