DNA मराठी

Sunetra Pawar: राष्ट्रवादीत अंतर्गत वाद नाहीच…, पक्षाकडून मोठा दावा

sunetra pawar

Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आणि संघटनात्मक बदलांच्या चर्चांना अखेर पक्षाकडून अधिकृत उत्तर देण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पक्षातील कोणतेही मोठे बदल झाले नसल्याचा दावा केला. विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात असून पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अविनाश आदिक म्हणाले की, “अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना मी पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियमित काम पाहत होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे काही काळ दिल्ली कार्यालयात जाणे झाले नाही. मात्र, दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासाठी वेगळे दालन कधीच नव्हते. पूर्वी जिथे बसायचे, आजही तिथेच बसतील. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे पक्ष आणि नेत्यांची विनाकारण बदनामी होत असून याप्रकरणी कायदेशीर कारवाईचा विचार केला जाईल.” तसेच ही पत्रकार परिषद पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आली आहे.

उमेश पाटील यांनीही पक्षातील नेतृत्वाबाबत कोणताही बदल झालेला नसल्याचे स्पष्ट केले. “प्रफुल पटेल आजही राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत आणि सुनील तटकरे हेच प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली यादी तात्पुरती होती. घाईगडबडीत वकिलाला पत्र द्यायचे असल्याने ती पाठवण्यात आली,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी पक्षातील सर्व अधिकार वर्किंग कमिटीकडे असल्याचे सांगत, “लवकरच पक्षाच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार असून त्यात सर्व विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जातील,” असे स्पष्ट केले. तसेच “सर्व अधिकार हे सुनेत्रा पवार यांच्याकडेच आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

महायुतीतील समन्वयाच्या मुद्द्यावर बोलताना उमेश पाटील यांनी आनंद परांजपे यांच्या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त केली. “महायुतीमध्ये एकमेकांचे पक्ष फोडायचे नाहीत, असे ठरले असतानाही आनंद परांजपे यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. आता एवढेच सांगतो, आहेत तिथे सुखी राहा,” असा टोला त्यांनी लगावला.

पक्षाच्या आर्थिक व्यवहारांबाबत रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही त्यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. “पक्षाचा खर्च ब्युटी पार्लरवर झाला की शौचालयावर, हे आम्ही पाहून घेऊ. घरात नवरा-बायको किंवा पालक-मुलांमध्येही खर्चाबाबत प्रश्न विचारले जातात,” असे ते म्हणाले.

याच पत्रकार परिषदेत उमेश पाटील यांनी रोहित पवार यांच्याबाबतही मोठा दावा केला. “२०१५-१६ मध्ये रोहित पवार यांनी विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी पवार कुटुंबियांवर दबाव टाकला होता. तिकीट न मिळाल्यास भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी होती,” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

या पत्रकार परिषदेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आणखी चव्हाट्यावर आली असून आगामी वर्किंग कमिटी बैठकीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *