Corona Update: केरळ नंतर आता राज्यात देखील कोरोनाचा नवीन व्हेरियंट हळूहळू पसरत आहे. कोरोना नवीन सबवेरियंट JN.1 राज्यात एन्ट्री केली आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोविडचे 640 रुग्ण आढळले आहेत. तर गुरुवारी ही संख्या 594 होती. यामुळे केंद्रासोबतच राज्य सरकारेही सतर्क आहेत.
मुंबईत Omicron व्हेरियंट BA.2 म्हणजेच JN.1 ची लागण झालेला रुग्ण आढळल्यानंतर राज्यात खबरदारीची पावले उचलली जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेएन.1 या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजी नगरमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका आता कोकणातून मराठवाड्यापर्यंत पोहोचला आहे.
मास्क घालण्याचे आवाहन
देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईसह संपूर्ण कोकणात नवीन बाधित लोकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
कारण जेएन.1 या नवीन व्हेरियंटचा एक रुग्ण कोकणातच आढळून आला आहे. दरम्यान, मुंबईत मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, खबरदारी म्हणून मुंबईकरांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संभाजीनगरमध्ये 2 रुग्ण आढळले
छत्रपती संभाजी नगर शहरात दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 66 नमुन्यांपैकी दोन रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल आणि फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या.
रुग्णालयांमध्ये आयसोलेशन आणि ऑक्सिजन बेडची व्यवस्था तयार ठेवावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
टास्क फोर्सची निर्मिती
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात टास्क फोर्स बनवा. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पावले उचलावीत. कोविड सेंटर, आयसोलेशन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड याविषयी माहिती घ्यावी. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी तात्काळ चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.