Sushma Andhare on Ashok Kharat Case : नाशिकच्या अशोक खरात या स्वयंघोषित ज्योतिषाला आज बलात्कार, योन शोषण प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात तपास करत असताना अशोक खरात याच्याकडे तब्बल 58 सेलिब्रिटी आणि हाय प्रोफाईल व्यक्तींचे व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे…
अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता.
विशेष; खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते.
आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? कारण अशा भामट्या ज्योतिष्यासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत. योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत.
महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे…? असं सुषमा अंधारे म्हणाल्या.






