Rahuri News : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांना व कुटुंबाला देण्यासाठी वेळ मिळत नाही. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच कुटुंबातील आई वडील, पत्नी व इतर नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी वेळ द्यायला हवा. या संकल्पनेतून नगराध्यक्ष मोरे यांनी नगरपरिषदेत एक उल्लेखनीय ठराव मंजूर केला. राहुरी पालिकेत सायंकाळी सात वाजता भोंगा वाजतो व साडेआठला भोंगा वाजतो.या दीड तासात मोबाईल, दूरदर्शन अशा माध्यमापासून शालेय विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी यांनी पूर्णपणे दूर रहावे अशी अपेक्षा नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी व्यक्त केली.
आजच्या युगात मोबाईलचा अति वापर, टीव्ही, सोशल मीडिया व इतर व्यसनाच्या सवयी यामुळे आपली तरुण पिढी बऱ्याच प्रमाणात भरकटलेली आपण पाहतो. पालक व मुलांमध्ये संवाद राहिला नाही.
लहान मुलानां चांगले वाईट यातील फरक सांगायला व त्यांच्यापाशी बसायला कोणाला वेळ नाही. या सर्व गोष्टीला जबाबदार आपण स्वतः पालक आहोत. पालक म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कि, आपल्या कडून या सवयीनां वेळीच आवर घातला पाहीजे.
याकारीता राहुरी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून राहुरी नगरपरिषदेच्या सभेत एकमताने हा विषय मंजूर करण्यात आला. त्यामध्ये सायंकाळी ७ वा. नगरपरिषदेचा सायरान वाजल्या नंतर सर्व पालकांनी आपल्या घरातील टिव्ही व इतर मनोरंजनांचे माध्यम बंद करायचे आहे. यानंतर मुलांना आपल्या घरातच अभ्यासासाठी बसावयाचे आहे.
आपण स्वतः घरात थांबुन पुस्तकाचे वाचन करणे, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे, त्यांच्याशी संवाद साधणे कुटुंबाला वेळ देणे. अशा प्रकारे दीड तासानंतर ठिक रात्री ८.३० वा. दुसरा सायरान वाजल्या नंतर पुर्ववत आपल्या कामाला वेळ दिला तरी चालेल.
आज हा निर्णय कठोर वाटत असला तरी पुढच्या पिढीला घडविण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेण्याची आपल्यावर वेळ आली आहे. तरी सर्व पालक वर्ग या गोष्टीचा काटेकोर अवलंब करतील व पालिकेच्या निर्णयाला पाठिंबा देतील, अशी अपेक्षा नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे तसेच सर्व नगरसेवक व नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले.






