SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत, शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, यासाठी शिर्डी उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. राहाता व कोपरगाव तालुक्यातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये (पूर्वीचे कलम १४४) प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) दिनांक १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत, तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) दिनांक २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहेत.
या संपूर्ण कालावधीत परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात परीक्षार्थी, परीक्षेच्या कामासाठी नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी व उपविभागीय दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ती वगळता अन्य कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स मशीन, फॅक्स मशीन, सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी/आयएसडी बूथ, तसेच ध्वनीक्षेपक व तत्सम उपकरणे परीक्षा सुरु असलेल्या वेळेत पूर्णपणे बंद ठेवावी लागतील.
परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात मोबाईल फोन, पेजर, संगणक, लॅपटॉप इत्यादी साहित्याचा वापर परीक्षा सुरू असलेल्या वेळेत करता येणार नाही. (मात्र, हा नियम परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वाहनांना लागू नसेल.) या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






