DNA मराठी

Shevgaon News : भगवानबाबा मल्टीस्टेट सोसायटीकडून 24.75 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

shevgaon

Shevgaon News: भगवानबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा बोधेगाव (ता. शेवगांव) येथील पदाधिकाऱ्यांनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ठेवीदाराची तब्बल 21 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी बालमटाकळी येथील शेतकरी महेश संभाजीराव लांडे (वय 34) यांनी शेवगांव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी लांडे यांनी शेतीतून साठवलेली रक्कम संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, व्हा. चेअरमन मयूर रंगनाथ वैद्य तसेच संचालक मंडळाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून मुदत ठेवी स्वरूपात गुंतवली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवहार पारदर्शक असून कोणताही तोटा होणार नाही, तसेच 11 ते 15 टक्के परतावा देण्याची हमी दिली होती. त्यानुसार फिर्यादी, त्यांचे वडील व भाऊ यांच्या नावावर वेगवेगळ्या तारखांना एकूण 24.75 लाख रुपयांच्या मुदत ठेवी करण्यात आल्या.

मात्र मुदत संपूनही मुद्दल व व्याजाची रक्कम देण्यास संस्थेचे पदाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे.

घराची पडझड झाल्याने व तातडीच्या आर्थिक गरजेमुळे पैसे मागितले असता आश्वासने देत वेळकाढूपणा करण्यात आला. यामुळे फिर्यादी मानसिक व आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या प्रकरणात संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून एमपीआयडी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *