Dhananjay Munde : माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढ्यात विजय झाला आहे. विधानसभा निवडणूक 2024 मधील त्यांच्या उमेदवारी अर्ज सोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेत लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा यांनी फौजदारी कारवाई करण्याबाबत फिर्याद प्रकरण दाखल केले होते. याबाबत आज परळी न्यायालयाने निकाल दिला असून सदर प्रकरणातील सर्व आरोप तथ्यहीन असल्याने ते फेटाळून लावले आहेत.
धनंजय मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद माहितीवरून करुणा शर्मा यांनी वेगवेगळे आरोप करत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
याप्रकरणी परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली, करुणा शर्मा यांनी नोंदवलेला जबाब, वकिलांचा युक्तिवाद यांसह वस्तुस्थिती लक्षात घेत न्यायालयाने करुणा शर्मा यांनी दाखल केलेली फिर्याद फेटाळून लावली आहे. धनंजय मुंडे यांच्या वतीने ॲड. अशोक कवडे यांच्या सह ॲड. हरिभाऊ गुट्टे यांनी काम पाहिले.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाजूने न्यायालयाने आणखी निकाल दिला आहे. याआधी देखील कृषी विभागाच्या खरेदी वरून निरनिराळे आरोप करत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये देखील कोणतेही तथ्य आढळले नाही आणि ते प्रकरण देखील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत तक्रारदाराला उलट दंड लावला होता.
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी परळीत एकहाती सत्ता कायम राखली, तेव्हा देखील न्यायालयाच्या निकालात आणि जनतेच्या निकालात आपला विजय झाल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.






