Maharashtra News : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रावर या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम झाला होता. या अनुषंगाने महसूल आणि कृषी विभागांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची आकडेवारी व मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.
राज्यातील सर्व बाधित जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकूण ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अहिल्यानगर जिल्ह्यास ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीचा लाभ जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
मदतीचा निधी वितरित करताना शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोर पालन करण्याच्या, नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या तसेच लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.