DNA मराठी

IMD Rain Alert: आज नगर जिल्ह्यात धो धो पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट; नगरकरांना दक्षतेचे आवाहन

IMD Rain Alert – अहिल्यानगरसह राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज १९ ऑगस्ट रोजी देखील नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

भिमा नदी (दौंड पूल) -३०४४ क्युसेक, सीना नदी (सीना धरण) २६९ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढील दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे मेघगर्जना, वीजा किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

वादळादरम्यान विद्युत उपकरणे वापरू नयेत व वीजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहावे.

मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, धातूची कुंपणे, लटकणाऱ्या केबल्स यांपासून दूर राहावे. जाहिरात फलकांच्या आसपास थांबू नये. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे.

धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.

नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नयेत.

मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये थांबू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी वेळीच स्थलांतर करावे, घाटरस्त्याने प्रवास टाळावा. शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे.

आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष – दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४, २३५६९४० उपलब्ध आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *