Mumbai Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे.
16 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर, पुणे, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला आज ( 16 ऑगस्ट) रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.
या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त, उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागाचे (वॉर्ड) सहायक आयुक्त, तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयात तत्काळ हजर राहून समन्वय साधावा. तसेच, गरजेनुसार योग्य त्या आपत्कालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले आहेत.
काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर (on ground) कार्यरत आहे.
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी, अभियंते, पंप ऑपरेटर आणि आपत्कालीन पथके सतर्क आहेत.
पर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, मलनि:सारण व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत.
तथापि,महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे.