Asia Cup 2025 : इंग्लडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेनंतर आता भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेत भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याची चर्चा सुरू आहे. तर आता आशिया कप 2025 मध्ये जसप्रीत बुमराह खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अहवालानुसार, जसप्रीत बुमराह देखील या स्पर्धेत खेळणार आहे आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी आशिया कपसाठी संघ निवडू शकते.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या हे पहिल्या पाचमध्ये मजबूत खेळाडू असल्याने निवड समिती या संघात फारसे बदल करू इच्छित नाही हे समजते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “अभिषेक शर्मा हा गेल्या आयसीसी रँकिंगमध्ये जगातील नंबर वन टी-20 फलंदाज आहे. संजू सॅमसनने गेल्या हंगामात फलंदाजी आणि यष्टीरक्षक दोन्ही बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे निर्णय घेणे कठीण होईल परंतु सध्याचा फॉर्म पाहता (कसोटीत जरी), शुभमनला दुर्लक्षित करता येणार नाही. त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली. निवडकर्त्यांसाठी समस्या अशी आहे की टॉप ऑर्डरमध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत.
जुरेल आणि जितेश यांच्यात स्पर्धा असेल
टॉप ऑर्डरमध्ये इतके खेळाडू असल्याने, यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांना स्थान मिळणे खूप कठीण जाईल. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक लोकेश राहुल, मधल्या फळीत फलंदाजी करत नसल्याने त्याचा विचार केला जाण्याची शक्यता नाही. सॅमसनची पहिली यष्टीरक्षक म्हणून निवड होणे जवळजवळ निश्चित असले तरी, दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेल यांच्यात स्पर्धा असेल. जुरेल गेल्या टी-20 मालिकेचा भाग होता तर जितेशने आयपीएलमध्ये आरसीबीच्या विजयी मोहिमेत प्रभावी कामगिरी केली. त्याने फिनिशरची भूमिकाही खूप चांगली बजावली.
तर अष्टपैलू खेळाडू म्हणून भारताची पहिली पसंती आहे, तर इंग्लंड मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त नितीश कुमार रेड्डी वेळेत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. तसेच शिवम दुबे यालाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर हे संघातील इतर दोन फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू असतील.