Jaykumar Rawal : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत केली.
भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. या विशेष तपास पथकाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, नागपूर असतील. जिल्हा पोलीस अधीक्षक, नागपूर हे सदस्य तर विभागीय सहनिबंधक, छत्रपती संभाजीनगर हे सदस्य सचिव असणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूरच्या कामकाजाची सखोल चौकशी करणे, पी. एल. खंडागळे समितीने यापूर्वी सादर केलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर महसुली हानीची जबाबदारी निश्चित करणे. सन 2017 मध्ये एल. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीतील गाळे वाटपातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती, त्यांनी अहवाल बाजार समितीकडे सादरही केला होता त्या अहवालातील निष्कर्षानुसार तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळातील सदस्यांनी तसेच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी / कर्मचारी यांनी भ्रष्टाचार केला आहे का? याची चौकशी करणे. तथ्य असल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे काम समिती करणार आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहाराचे पडताळणी करण्याकरीता एसआयटीला विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या विशेष तपास पथकाने 30 दिवसांच्या आत आपला अहवाल शासनास करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.