land Scam Sawedi :- अहिल्यानगर : सावेडी येथील मौजे सावेडीमधील तब्बल १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाची जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे हडप (land Scam) करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर अखेर या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तब्बल ३४ वर्षांपूर्वी घडलेला हा प्रकरण पुन्हा उफाळून आल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नागरिकांत संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.\
शेख मतिन आलम बशिरुद्दीन यांनी सह जिल्हा निबंधक, मार्केटयार्ड रोड, माळीवाडा, अहिल्यानगर, तसेच दुय्यम निबंधक कार्यालय (अहिल्यानगर १ दक्षिण) यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार सादर केली आहे.
शेख यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक १५ ऑक्टोबर १९९१ रोजी खोट्या खरेदीखताच्या (Fake purchases) आधारे सदर जमीन पारसमल मश्रीमल शाह (रा. गांधीनगर, गुजरात) यांच्या नावे नोंदवण्यात आली होती.
त्यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आणि मिळकतीवर कोणतीही नवीन नोंदणी होऊ न देण्याची मागणी केली आहे. शेख यांच्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.की, सावेडी येथील सर्व्हे नं. २४५/८/१ (७२ आर) व २४५/ब/२ (६३ आर) अशी मिळकत बनावट खरेदीखतावर नोंदवण्यात आली आहे.
यामध्ये गणेश शिवराम पाचार्णे यांच्या नावाने खोटे कुलमुखत्यारपत्र तयार करून जमीन विक्रीचा बनाव करण्यात आला. हे दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात क्रमांक छ-४३० व जादा पुस्तक क्र. १, खंड १९६, पृष्ठ २१ ते ३२ नुसार नोंदवण्यात आले होते.
शेख यांनी आपल्या तक्रारीत मागणी केली आहे की, या प्रकरणी खोट्या कागदपत्रांवर नोंदणी करणाऱ्यांवर आणि बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करावी.
तसेच मिळकतीवर पुढील नोंदणीस बंदी घालण्यात यावी, अन्यथा मूळ हक्कधारकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे सावेडी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आणि स्थानिकांनी प्रशासनाकडे दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जर तातडीने कारवाई झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, निबंधक कार्यालय आणि महसूल प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील प्रक्रिया सुरू केल्याचे समजते.