DNA मराठी

अहिल्यानगर – सावेडीतील जमीन घोटाळा नोंदणीच्या प्रकरणाने शहरात खळबळ उडवली असतानाच या घोटाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाय धरून “आम्हाला वाचवा” अशी गाऱ्हाणी केली आहे. लाज न शरम! जे अधिकारी स्वतःच्या भ्रष्ट कारभाराने जनतेचा विश्वासघात करत आहेत, तेच आता प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायांवर लोटांगण घालत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे.

वरिष्ठांचे छत्र — भ्रष्ट अधिकाऱ्यांचे बिनधास्त कारनामे
या प्रकरणातच नाही, तर यापूर्वीही ह्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या प्रकरणात स्वतःला वाचवण्यासाठी वरिष्ठांकडून आश्वासन मिळवले होते. त्या आश्वासनाची पूर्तता अजूनही सुरूच आहे आणि आता नव्याने उघडकीस आलेल्या या घोटाळ्यासाठीही त्यांना वाचवण्याचा शब्द मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासन हेच भूमाफियांना आणि त्यांच्या साथीदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

35 वर्षांनंतर नोंदणीचा खेळ — भूमाफियांना मोकळे रान
सावेडीच्या सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) या एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीची नोंदणी 35 वर्षांनी उगम पावली, आणि तिच्यामागील काळजीपूर्वक आखलेला भ्रष्ट कारभार उघड झाला. गटाचे विभाजन 1992 मध्ये झाले, पण 1991 मध्येच गट 245/ब 2 च्या नावाने खरेदीखत दाखवले गेले! अशक्य गोष्ट सहज शक्य करण्यात आली — आणि याचे मूळ मुळात नोंदणी कार्यालयातील सडलेल्या व्यवस्थेत आहे.


प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
प्रशासनाने या प्रकरणात त्वरित कारवाई केली असती, तर इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेचा संताप उफाळून आला नसता. परंतु, हेच अधिकारी आणि भूमाफिया यांच्या साटेलोट्याला छुपे पाठबळ दिल्याचा आरोप सध्या जोर धरत आहे.


जनतेचा एकच नारा — दोषींवर कारवाई करा!
सावेडीतील सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच आता एका सुरात म्हणत आहेत – “दोषींवर कठोर कारवाई करा, भूमाफियांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई झाली पाहिजे!”
जर प्रशासनाने आता पावले उचलली नाहीत, तर जनतेचा उद्रेक होणार हे निश्चित! आणि त्या वेळी या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ढालही त्यांना वाचवू शकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *