Ahmednagar News: येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका हद्दीतील नैसर्गिक ओढे, नाले यांच्यावरील अतिक्रमण काढून उपाययोजना करण्यात यावी यासाठी अहमदनगर महापालिका आयुक्तांना बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी निवेदन दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, थोड्याच दिवसात पावसाळा सुरु होणार आहे, मात्र अद्याप महानगरपालिका हद्दीतील नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, पथदिव्यांची दुरुस्ती करणे, पावसाळी गटार स्वच्छ करणे या सर्व उपाययोजना शहरामध्ये झालेले नाही.
त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या सर्व उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे कुणाल भंडारी यांनी केली आहे.
उपनगरातील नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण करुन पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत बांधकाम व्यवसायिकांनी त्यावरती बांधकाम करुन अतिक्रमण केल्याने अनेकांच्या घरी गेल्या काही वर्षांपासून पाणी घुसण्याचे प्रकार समोर येत आहे.
यामुळे यंदाच्या पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसुन मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे व नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच बऱ्याच ठिकाणचे पथदिवे बंद असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अनेक ठिकाणी आत्ताच तयार केलेल्या नवीन रस्त्यांवर खड्डे झाले आहे.
खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने खड्ड्यात जाऊन पाणी उडल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रकारचे वादविवाह होतात. त्यामुळे सामाजिक शांततेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच या साचलेल्या पाण्यांमध्ये डासांचे प्रमाण वाढत आहे व त्यामुळे डेंगु, मलेरिआ चिकन गुणिया सारखे गंभीर आजार नागरिकांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे.
तसेच शहरातील प्रभाग अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग अधिकारी, कर्मचारी यांचे नाव व मोबाईल नंबरची माहिती वृत्तपत्रातुन प्रसिध्द करावी आणि पावसाळ्यापुर्वीच्या सर्व उपाययोजना त्वरीत पुर्ण करण्यात याव्यात. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही या निवेदना मार्फत देण्यात आला आहे.