Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले असून शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित “मिशन आरंभ २०२४” उपक्रमांतर्गत दि. १० मार्च रोजी आयोजित केलेल्या इयत्ता-चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल दि. २० मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून स्पर्धात्मक स्वरूपाच्या अभ्यासाची तयारी ग्रामीण भागातील मुलांनी प्राथमिक स्तरापासूनच सुरू करावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला. यामध्ये शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडजळगाव येथील श्रीपद्म प्रविण शिंदे ( इयत्ता चौथी ) याने या परीक्षेत ३०० पैकी २५२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून त्याने तालुकास्तरावर आठवा तर बालमटाकळी केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
त्याचबरोबर अमृता पांडुरंग पाटील, श्रावणी जगदीश तहकीक, साईराज प्रभाकर तहकीक, स्वरा वैजिनाथ नागरे, शिवराज बाळासाहेब तहकीक, शिवानी राजेंद्र जाधव अशी एकूण सात विद्यार्थी संबंधित परीक्षेत पात्र ठरले आहेत. मुलांच्या गुणवत्ता विकासात शाळेचे आदर्श वर्ग शिक्षक प्रविण शंकर शिंदे त्याचप्रमाणे सहकारी आदर्श शिक्षिका श्रीमती राजगुरू भारती भाऊसाहेब, श्रीमती तनपुरे संतोषी शामराव व श्रीमती गर्जे मंगल देवराव यांचे मोलाचे असे मार्गदर्शन व योगदान लाभले.
शालेय भौतिक विकास त्याचबरोबर विद्यार्थी गुणवत्ता विकास कामी शेवगावचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी डॉ. शंकर आसाराम गाडेकर, केंद्रप्रमुख काळु भांगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.