Dhruv Jurel : भारतीय संघाने रांची कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा पराभव केला आहे. या सामन्यात भारताला आणखी एक स्टार खेळाडू मिळाला आहे. होय, आपल्या पदार्पणापासूनच यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल सोशल मीडियावर चर्चेत आहे.
रांची कसोटीच्या पहिल्या डावात त्याला शतक झळकावण्याची संधी होती मात्र तो 90 धावांवर बाद झाला. यामुळे त्याने आता असा विक्रम केला आहे जो त्याला लक्षात ठेवायला आवडणार नाही.
रांची कसोटीमध्ये भारतीय संघाने पहिल्या डावात 307 धावा केल्या होत्या. या डावात 171 धावांच्या स्कोअरवर भारताने 7 विकेट गमावल्या होत्या पण ध्रुव जुरेलने चमकदार कामगिरी करत इंग्लंडच्या मोठ्या आघाडीच्या आशा संपुष्टात आणल्या. ध्रुव जुरेलमुळे इंग्लंडला फक्त 46 धावांची आघाडी घेता आली.
महेंद्रसिंग धोनीच्या यादीत ध्रुवचा समावेश
2012 मध्ये नागपूर कसोटीत महेंद्रसिंग धोनी 99 धावा करून धावबाद झाला होता. तर 2007 मध्ये ओव्हल कसोटीमध्ये तो 92 धावावर बाद झाला होता. तर आता रांची कसोटीमध्ये ध्रुव जुरेल देखील 90 धावांवर बाद झाला आहे.
रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लडचा 5 विकेटने पराभव करत पाच सामन्याच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
रांची येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकामुळे संघाने पहिल्या डावात 353 धावा केल्या. भारत पहिल्या डावात अडचणीत सापडला होता आणि संघाने 177 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या पण येथे कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल यांच्या भागीदारीने भारताला 307 धावांपर्यंत नेले.
दुसऱ्या डावात 46 धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ अवघ्या 145 धावांवर गारद झाला. आर अश्विनने 5 तर कुलदीपने 4 विकेट घेतल्या आणि भारताचा विजय निश्चित केला.