Zika Virus: झिका, डेंग्यू यासारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवून डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसहभाग तसेच महापालिका प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नांतून विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येईल असे प्रतिपादन महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी केले. झिका, डेंग्यू आदी विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी एक तास स्वच्छतेचा हा उपक्रम दर रविवारी राबवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते.
त्यानुसार महापालिकेच्यावतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी डॉ. बोरगे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.
एडिस डासामुळे विषाणूजन्य आजार पसरतात. एडीस डास हा आपल्या परिसरात स्वच्छ पाण्यात वाढत असल्याने आपल्या जवळपास कोणत्याही प्रकारचे पाणी साचू देऊ नये. फ्रीजचे ट्रे, कुंड्या, पक्षांना पिण्यासाठी ठेवलेले पाण्याचे भांडे, जुने टायर भंगार वस्तू इत्यादी ठिकाणी साचणारे पाणी वाहते करून ही डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट केल्यास विषाणूजन्य आजारांना रोखता येईल. त्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा असल्याचे यावेळी डॉ बोरगे यांनी सांगितले.
महापालिका आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या या जनजागृती कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या परिसरातील डास उत्पत्ती निर्माण करणारी स्थाने नष्ट केली. आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनानुसार अहमदनगर शहरातील सर्व भागांमध्ये नागरिक स्वयंप्रेरणेने डेंग्यू विरोधी जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन त्यासाठी आवश्यक असलेल्या उपायोजना करीत आहेत. त्यामुळे विषाणूजन्य आजारांवर आपण सर्व निश्चितच नियंत्रण मिळवू असा विश्वास डॉ. अनिल बोरगे यांनी यावेळी व्यक्त केला.
नगर शहरात डेंग्यू मुक्त अभियानात आठवड्यातुन दर रविवारी एक तास नागरिकांना सहभागी करून कुंड्या,कूलर,जुन्या निरोपयोगी वस्तू ,टायर यामध्ये साचलेले पाणी रिकामे करण्यात यावी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा तसेच ताप- डोके- डोळे- सांधे दुखणे, मांसपेशी दुखणे तापा सोबत,अंगावर लालसर पुरळ येणे,उलट्या होणे पोट दुखणे उलटी लक्षण आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन सल्ला घ्यावा तसेच डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया हे आजार डासां मार्फत होतात त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये डेंग्यू आजारावर योग्य वेळेत औषध उपचार केल्यास रुग्ण खात्रीने बरा होतो डेंगू आजाराच्या निदानासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे मोफत रक्ताची एलायझा चाचणी करून घ्यावी तपासाची लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिली.