Maharashtra Politics : आज राज्यात एक विचित्र चित्र दिसत आहे. तरुणांच्या आयुष्याशी संबंधित खरे प्रश्न बाजूला पडत चालले आहेत आणि जात-धर्माच्या नावावर वातावरण तापवण्याचे प्रकार वाढत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट, भाषणांमध्ये आक्रमक शब्द आणि रस्त्यावरचे वाद यात सर्वात जास्त वापर होत आहे तो युवकांच्या भावनांचा.
खरं पाहिलं तर आजच्या तरुणासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. कॉलेजची वाढती फी, शिक्षणासाठी घेतलेली कर्जे, नोकरीची अनिश्चितता, शेतीतून मिळत नसलेले उत्पन्न आणि वाढती महागाई हेच वास्तव आहे. अनेक घरांमध्ये आई-वडील मुलांच्या भविष्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहेत. पण या प्रश्नांवर मोठं आंदोलन किंवा ठाम चर्चा क्वचितच दिसते. कारण तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते.
जात आणि धर्माच्या नावावर भडकवणे हे आज काही लोकांसाठी राजकीय साधन बनले आहे. भावना पेटल्या की प्रश्न विचारले जात नाहीत आणि हाच काही राजकारण्यांचा फायदा असतो. वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी समाजात विभागणी निर्माण केली जाते. तरुणांना पुढे करून संघर्ष उभा केला जातो, पण त्या संघर्षात भडकावणाऱ्यांची स्वतःची मुलं किंवा कुटुंबीय कधीच दिसत नाहीत.
दंगली, भांडणं किंवा आक्रमक आंदोलनांत अडकणारा तरुण मात्र सामान्य घरातून आलेला असतो. एका चुकीच्या क्षणी झालेला गुन्हा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. पोलिस केस, कोर्टकचेऱ्या, नोकरीच्या संधी संपणे याचा फटका फक्त त्या मुलाला नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बसतो. भडकावणाऱ्यांचे काहीच बिघडत नाही; नुकसान होते ते सर्वसामान्यांच्या भविष्याचे.
जात आणि धर्माचा अभिमान ठेवणे चुकीचे नाही. पण त्या नावाखाली स्वतःचे आयुष्य धोक्यात घालणे शहाणपणाचे नाही. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, तुम्ही सुरक्षित आणि सक्षम असाल तरच तुमची ओळख टिकते. तुम्हीच नसाल तर जात-धर्माचा अर्थ उरत नाही.
आज युवकांनी स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा, आपण कोणासाठी रागावतो आहोत? आपल्या भविष्याकरिता की कोणाच्या राजकीय फायद्यासाठी? जे लोक सतत भडकवतात, त्यांच्या भूतकाळाकडे पाहा; अनेकदा वैयक्तिक स्वार्थातून सुरू झालेल्या गोष्टींना नंतर सामाजिक रंग दिला जातो. हे ओळखण्याची जबाबदारी युवकांचीच आहे.
आज गरज आहे ती दिशा बदलण्याची. शिक्षण परवडणारे व्हावे, रोजगार वाढावा, शेतीला योग्य भाव मिळावा, महागाई कमी व्हावी या मुद्द्यांवर तरुणांनी आवाज उठवला तरच खरा बदल घडेल. रागाने नव्हे, तर विचाराने समाज बदलतो.
आई-वडील तुमच्यासाठी आयुष्य झिजवत असतात. तुमच्या एका चुकीच्या पावलाने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे निर्णय घेताना घोषणांपेक्षा घरातील परिस्थिती आठवा.
तरुणांनो, भावना ठेवा पण विवेकही ठेवा. राजकारण तुमच्यासाठी असावे; तुम्ही राजकारणासाठी नाही. आधी स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य घडा… बाकीच्या लढाया नंतरही लढता येतात.






