Walmik Karad : वाल्मिक कराड याच्यावर आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होत आहे आणि यातूनच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचेही बोलले जात आहे. पण सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत पुन्हा एकदा भर पडली आहे.
याला कारण आहे त्याची संपत्ती. मागील काही दिवसांपासून वाल्मिक कराड, त्याची पत्नी आणि मुलांच्या नावावर राज्यात विविध ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती. साधा घरगडी असणाऱ्या वाल्मिक कराड कडे इतकी संपत्ती कुठून आणि कशी आली? याचे कोडे अजूनही उलगडले नाही.
पण आता वाल्मिक कराडची ही सर्व संपत्ती एसआयटीने जप्त करण्याची तयारी सुरु केली असून त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज देखील दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा देखील संकलित केला आहे.
त्याचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त करण्यात येतील, असे बोलले जात आहे. हा वाल्मिक कराडसाठी खूप मोठा धक्का ठरु शकतो. याआधी सीआयडीने कराडची संपत्ती परदेशात असल्याचा संशय व्यक्त केला होता. अशातच आता एसआयटीने कराडच्या संपत्तीची पाळेमुळे खणायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळते.