Vikhe Patil on Rohit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर आता त्यांचा अपघात की घातपात यावरून रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संशय व्यक्त केला आहे. यावरती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. अजितदादा ज्यावेळेस हयात होते तेव्हा रोहित पवार तसेच शरद पवार हे त्यांच्याशी कसे वागले हे राज्याच्या जनतेला माहित आहे. तुम्ही दादांना कधीच सन्मान मिळवून दिला नाही तसेच त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देखील तुम्हीच नाकारली याचं प्रथमता उत्तर द्या अशा शब्दात विखे पाटलांनी शरद पवारांवर देखील टीका केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी बारामती येथील विमानतळावरती विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर अनेक दिवस उलटले असतानाही तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला तसेच दादांचा अपघात नव्हे तर घातपात होता असा संशय देखील पवारांनी व्यक्त केला.
यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवीच आहे याचं आम्हालाही दुःख आहे. घटनेची सत्यता जाणून घेण्याचं अधिकार कुटुंबीयांसह राज्यातील जनतेला आहे. त्या पद्धतीने तपास कार्य सुरू आहे. मात्र रोहित पवार सातत्याने माध्यमं समोर येऊन वेगवेगळी माहिती देत आहेत सर्व प्रकरण चौकशी मध्ये असल्याने याची योग्य ती चौकशी होईल.
तसेच यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले, अजित पवार हे हयात असताना रोहित पवार तसेच शरद पवार हे त्यांच्याशी कसे वागले हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. त्यांना कधीच सन्मान जनक वागणूक ही त्यांच्याकडून देण्यात आली नाही. काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादीला जास्त जागा मिळून देखील मुख्यमंत्री होण्याची संधी कोणी नाकारली याचे उत्तर प्रथमता त्यांनी द्यावी अशा शब्दात मंत्री विखे यांनी शरद पवार यांच्या नाम उल्लेख टाळत त्यांच्यावरती देखील जोरदार निशाणा साधला.
अजित पवारांच्या निधनानंतर वीस दिवस उलटले असताना देखील तपास कार्य अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने आमदार रोहित पवार यांनी दोन वेळेस पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडले व अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय देखील त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला तसेच तपास यंत्रणेवर देखील संशय व्यक्त केला. याचबरोबर सत्ताधाऱ्यांवर ती देखील या घटनेवरून जोरदार निशाणा साधला यामुळे रोहित पवारांनी केलेले आरोप तथ्य आहे की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.






