Vaishno Devi Landslide : माता वैष्णो देवी येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर 22 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या घटनेनंतर वैष्णो देवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्याच वेळी, मोठ्या संख्येने भाविक दर्शनाशिवाय घरी परतू लागले आहेत, तर 4000 हून अधिक भाविक कटरा येथे यात्रा सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
भूस्खलनानंतर प्रवास मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाला आहे आणि प्रवास मार्ग दुरुस्त करण्यासाठी काही वेळ लागू शकतो. या नैसर्गिक आपत्तीमुळे जम्मू आणि काश्मीरच्या इतर भागातही मुसळधार पाऊस आणि पूर आला आहे.
मंगळवारपर्यंत, जम्मू आणि कटरा येथे सुमारे 20 हजार भाविक हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये राहत होते. मंगळवारी दुपारी अर्धकुंवरीजवळ भूस्खलन झाल्यामुळे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात ढिगारा कोसळल्याने यात्रा मार्गाचा 200 फूट भाग खराब झाला. ढिगारा हटवण्याचे आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे पण त्यासाठी वेळ लागू शकतो.
पावसामुळे निर्माण झालेले संकट
मंगळवार ते बुधवार सकाळपर्यंत उधमपूरमध्ये 629.4 मिमी आणि जम्मूमध्ये 296 मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम हिमालयीन प्रदेशात एका दिवसात झालेल्या पावसाचा हा एक नवीन विक्रम आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे आतापर्यंत 34 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
झेलम आणि इतर नद्यांची पाण्याची पातळी
बुधवार दुपारनंतर जम्मूमध्ये हवामान सुधारले, परंतु काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे झेलम आणि इतर नद्यांची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. श्रीनगरच्या राजबाग भागात पाणी साचल्याने पोलिसांनी तिथून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
पूरग्रस्त भागात मदतकार्य
जम्मू विभागातील किश्तवाड आणि अनंतनागमध्येही पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. मंगळवारी रात्री किश्तवाडच्या वाधवान येथे ढगफुटीमुळे 10 घरे वाहून गेली. दुसरीकडे, अनंतनाग जिल्ह्यातील लिडर नदीत अडकलेल्या 22 जणांना एसडीआरएफच्या जवानांनी सुरक्षितपणे वाचवले. शेषनाग नाल्यात आलेल्या पुरामुळे पहलगाममधील चार इमारतींचे नुकसान झाले आहे.
भरपाई जाहीर
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक भाविकाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मूमधील पूरग्रस्त भागांना भेट देताना प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना 6 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य
पुरामुळे जम्मू आणि त्याच्या आसपासच्या भागातून 25000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. याशिवाय, गुरुवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने पूरग्रस्त भागात वाहतूक पूर्ववत केली आहे, जरी काही ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते वाहून गेल्यामुळे वाहनांना बंदी आहे.