DNA मराठी

Rupali Chakankar

sushma andhare

Sushma Andhare : ‘महिला सक्षमीकरणाच्या पदावरून पब-बारचा व्यवसाय?’ सुषमा अंधारेंची रुपाली चाकणकरांवर टीका

Sushma Andhare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचे नाव पब-बारच्या व्यवसायाशी जोडले जात असेल, तर हा नैतिक अधिकाराचा गंभीर प्रश्न असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी विविध मुद्द्यांवर सरकार आणि संबंधित व्यक्तींवर टीका केली. रुपाली चाकणकर यांच्या कथित हॉटेल-पब-बार व्यवसायाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी प्रत्येकाला रोजगार करण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले. पब किंवा बारचा व्यवसाय करणे हा कायद्याच्या चौकटीतील व्यवसाय असेल तर त्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीचे नाव बारच्या मालकीण म्हणून चर्चेत येत असेल, तर नैतिकतेच्या दृष्टीने हा प्रश्न निर्माण होतो, असे अंधारे यांनी म्हटले. महिला आयोग ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांवरील अन्यायाविरोधात काम करणारी संस्था आहे. त्यामुळे या पदावर असलेल्या व्यक्तीबाबत अशा प्रकारच्या चर्चा होणे गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये नाव येण्यापासून ते पब-बार व्यवसायापर्यंतच्या मुद्द्यांचा संदर्भ देत अंधारे यांनी चाकणकरांवर निशाणा साधला. या प्रकरणावरून त्यांनी महिला आयोगाच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित केले. रुग्णालयातील घटनेवरून सरकारवर सवाल अमरावतीतील रुग्णालयातील घटनेवरूनही सुषमा अंधारे यांनी सरकारला धारेवर धरले. २०२२ मध्ये याच रुग्णालयात अशाच प्रकारची घटना घडली होती. त्या घटनेचा चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नाही, असा दावा त्यांनी केला. रुग्णालयातील विविध कामांसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी निधीसाठी पाठपुरावा केला होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रुग्णालयाला निधी उपलब्ध करून दिला जातो. या समितीचे प्रमुख पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. मात्र, रुग्णालयासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. याच मुद्द्यावरून त्यांनी नवनीत राणा यांच्या हनुमान गढीच्या विकासासाठी देण्यात आलेल्या निधीचा संदर्भ देत सरकारला प्रश्न विचारला. रुग्णालयासाठी निधी उपलब्ध नाही, असे सांगितले जाते; मग हनुमान गढीसाठी १२१ कोटी रुपये कसे उपलब्ध झाले?, असा सवाल त्यांनी केला. हनुमान गढीवर मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याबाबत पोलिसांनी दिलेल्या अहवालावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. चुकीचा अहवाल देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. लहान मुलांच्या जीवाशी संबंधित प्रकरण असल्याने हा विषय गंभीरपणे हाताळण्याची गरज असल्याचे अंधारे यांनी सांगितले. औषध निरीक्षक भरती रद्द केल्याचे स्वागत औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत पेपरफुटीचा आरोप झाल्यानंतर सरकारने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सुषमा अंधारे यांनी स्वागत केले. मात्र, केवळ परीक्षा रद्द करून प्रश्न सुटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पेपर फुटला कसा? पेपर फोडणारे कोण होते? त्यांना कधी अटक केली जाणार? असे प्रश्न त्यांनी सरकारला विचारले. पेपरफुटीमागील व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. याशिवाय ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी मेहनत घेतली आणि ज्यांची वयोमर्यादा पुढील भरतीच्या वेळी संपणार आहे, त्यांच्या भवितव्याचे काय, असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला. पेपरफुटीची जबाबदारी सरकारची असल्याने संबंधित उमेदवारांना न्याय देण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बाळांना वाचवणाऱ्या परिचारिकांचा सन्मान करा अमरावतीतील रुग्णालयात घडलेल्या घटनेच्या वेळी बाळांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या परिचारिकांचे अंधारे यांनी कौतुक केले. संकटाच्या काळात या परिचारिकांनी दाखवलेले धैर्य महत्त्वाचे असल्याचे सांगत, त्यांना सरकारी सेवेत कायम करण्यात यावे, पुरस्कार देण्यात यावा आणि शौर्यपदकाने सन्मानित करावे, अशी मागणी त्यांनी केली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था, निधी आणि प्रशासनाच्या कामकाजाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही अंधारे यांनी सांगितले. एकूणच, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर केलेली टीका, अमरावतीतील रुग्णालयाच्या निधीचा मुद्दा आणि औषध निरीक्षक भरतीतील पेपरफुटी या तीनही विषयांवरून सुषमा अंधारे यांनी सरकारला लक्ष्य केले. या सर्व प्रकरणांमध्ये सरकारने केवळ घोषणा न करता चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Sushma Andhare : ‘महिला सक्षमीकरणाच्या पदावरून पब-बारचा व्यवसाय?’ सुषमा अंधारेंची रुपाली चाकणकरांवर टीका Read More »

rupali chakankar

Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर 19 जणांवर गुन्हा; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश

Rupali Chakankar : सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरून पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे, अभिनेत्री दिपाली सय्यद, सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी, डॉ. आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सेलशी संबंधित योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे. चाकणकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नाशिक येथील ईशान्येश्वर महादेव मंदिर ट्रस्टशी संबंधित अशोक खरात यांचा उल्लेख केला आहे. एका सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने खरात यांच्याशी आपली पूर्वी भेट झाली होती, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. खरात याच्यावर पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर त्याच्यासोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे. या फोटो-व्हिडिओच्या आधारे आपल्याबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबसह विविध डिजिटल माध्यमांवरून आपल्याविरोधात अपमानास्पद मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. तसेच काही पोस्ट आणि कमेंट्समध्ये शिवीगाळ, धमकी तसेच अश्लील भाषेचा वापर करण्यात आल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे आपली मानहानी झाली असून, सोशल मीडिया कमेंट्सच्या माध्यमातून लैंगिक स्वरूपाचा छळही करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित पोस्ट, व्हिडिओ, कमेंट्स आणि स्क्रीनशॉट्सचे पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रारीची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट कोणी तयार केल्या, त्या कोणाकडून प्रसारित झाल्या आणि त्यामागे नेमकी भूमिका कोणाची होती, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Rupali Chakankar : रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर 19 जणांवर गुन्हा; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश Read More »

ashok kharat

Ashok Kharat Case: अशोक खरात विरोधात 17 गुन्हे दाखल; न्यायालयात दाखल होणार दोषारोप पत्र

Ashok Kharat Case : संपूर्ण राज्यात चर्चेत असणारा नाशिक जिल्ह्यातील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत १७ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी ९ गुन्ह्यांचा तपास SIT करत आहे. ३ गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करीत आहे. तसेच ३ गुन्ह्यांचा तपास नाशिक शहर पोलीस करीत आहेत. २ गुन्ह्यांचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस करीत आहेत. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्ह्याचा तपास SIT चे मार्फतीने करणेबाबत आदेश केल्यामुळे २० मार्च पासून या व इतर १०, अशा एकूण ११ गुन्ह्यांचा तपास SIT करीत आहे. या विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून २ पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक तपास अधिकारी म्हणून ३ पोलीस निरीक्षक, ३ सहा. पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक व ६ पोलीस अंमलदार असे एकूण २४ पोलिसांचे पथक कार्यरत आहे. SIT कडे तपासास असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराचे एकूण ८ गुन्हे आहेत. तसेच फसवणूकीचा १ गुन्हा आहे. तसेच अशोक खरात याने साक्षीदारांविरूद्ध खोटा खंडणीचा १ गुन्हा दाखल केला होता. अशोक खरात याने फिर्यादीवर दबाव टाकून साक्षीदाराविरूद्ध १ गुन्हा दाखल केला होता, असे २ गुन्हे आहेत. उर्वरित ८ गुन्ह्यांचा तपास संबंधीत घटक करत आहेत. अशोक खरात विरूद्ध दाखल असलेल्या एकूण गुन्हयांपैकी ८ गुन्हे हे महिलांचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. तसेच उर्वरित ९ गुन्हे हे फसवणूक सह अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम २०१४ व इतर या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्व ८ गुन्हे व फसवणुकीचा १ गुन्हा SIT तपास करीत आहे. आजपर्यंतच्या तपासा दरम्यान १०५ पेक्षा अधिक साक्षीदारांकडे विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे व पीडितांकडे केलेल्या चौकशीतून आरोपी हा पीडित व्यक्ती व कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, भीती दाखवून, खडे, चिंचुके, रूद्राक्ष, पुजा, विधी आदी माध्यमातून त्यांचेकडून पैसे उकळत होता, तसेच महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. तसेच ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये, हात चलाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत होता, याबाबत आरोपी विरोधात मौखिक, भौतिक, दस्तऐवजी, परिस्थितीजन्य, इलेक्ट्रॉनिक पुरावा असे पुरावे प्राप्त झाले आहेत. त्या अनुशंगाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे. महिलांशी संबंधीत गुन्ह्यांमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यापासून ६० दिवसांच्या आत दोषोरापपत्र दाखल करणे आवश्यक असते. अशोक खरात विरोधात लैंगीक अत्याचाराचा पहिला गुन्हा १७ मार्च रोजी दाखल झाला. त्या नंतर आठवडा भरात इतर सात गुन्हे दाखल आहेत. आज रोजी एकुण लैंगिक अत्याचारांचे गुन्ह्यांपैकी अशोक खरात विरोधातील एकूण २ गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहेत. उर्वरीत गुन्ह्यांचे देखील दोषारोपपत्र येत्या काही दिवसात न्यायालयात दाखल करण्यात येतील. SIT कडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह व्हिडीओच्या १३ हजार १७५ लिंक्स SIT च्या सायबर टीमने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने SIT ने काढून टाकल्या आहेत. तसेच सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणारे ४५१ अकाऊंट देखील कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले आहेत. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी आतापर्यंत २ गुन्हे दाखल केले गेले आहेत. गुन्हयातील आरोपी अशोककुमार एकनाथ खरात हा एकूण ४९ दिवस वेगवेगळ्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाचे कस्टडीत होता. त्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. सध्या तो इतर ठिकाणच्या गुन्ह्यात अटक आहे. आज पावेतो दाखल गुन्हयांचे तपासामध्ये प्राप्त झालेल्या साक्षी पुराव्यांवरून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेले असले तरीही वरील गुन्ह्यांचा तपास पुढे सुरूच राहणार असुन अधिकचे पुरावे प्राप्त होताच ते न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रासह दाखल करण्यात येतील, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Ashok Kharat Case: अशोक खरात विरोधात 17 गुन्हे दाखल; न्यायालयात दाखल होणार दोषारोप पत्र Read More »

ashok kharat

Ashok Kharat Case: भोंदू खरात प्रकरणाचा इम्पॅक्ट ; एका महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर एकच महिन्यात पोलिसांनी राज्यातील विविध ठिकाणी 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल केले आहे. यात बहुतेक प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अयशस्वी ठरले असले तरी अंनिस आपल्या पातळीवर त्याचे प्रबोधन, प्रचार, प्रसार करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे. नाशिक येथे घडलेल्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर एक महिन्यात राज्यात एकून 15 गुन्हे दाखल झाले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणारी ही घटना आहे. भोंदू बाबांनी ग्रामीण भागासह शहरी भागातील महिला व पुरुषांची फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे. विशेषता यात महिलांचे शारीरिक शोषण, आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे. भितीपोटी व सामाजिक प्रतिष्टेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत आहे, त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह ॲड रंजना गवांदे , सहकार्यवाह विष्णू लोणारे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून केले आहे. “खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा पण निर्माण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी उत्स्फूर्त तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नाने गुन्हे दाखल झाले आहे. इतरही आणखी पीडितांनी पुढे यावे, असे आवाहन अंनिस करत आहे “ -संजय बनसोडे, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस गेल्या एक महिन्यातील दाखल गुन्हे: 1) अशोक कुमार खरात , नाशिक 2) गडगेबाबा ( राजेंद्र गडगे) , संगमनेर , अहिल्यानगर 3) चेतन सुनील माळी ( मूर्तिजापूर, अकोला ) 4) पंकज देवराम घोलप, (येडगांव, पुणे ) 5) मनोहर मामा भोसले, (कुरुडवाडी , सोलापूर ) 6)नाना बर्डे , (आळे फाटा , पुणे ) 7) ऋषिकेश वैद्य ( वसई .मुंबई ) 8) अल्ताफ रईस खान ( मालाड, मुंबई) 9) रिधम पांचाळ ( मालाड, मुंबई ) 10) गणेश शिंदे ( श्रीरामपुर, अहिल्यानगर ) 11) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई 12)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक 13)किसन तळपे मंदोशी, खेड 14 ) महेशगिरी ( महेश काकडे) निफाड,नाशिक 15) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड

Ashok Kharat Case: भोंदू खरात प्रकरणाचा इम्पॅक्ट ; एका महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल Read More »

rupali chakankar

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक,जमीन व्यवहारात आमचा संबंध नाही

Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या राज्याचे माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले.मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे.याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले. तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले ,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही,हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे . तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले,कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे. यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.केवळ तर्कवितर्क,अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय,बदनाम केले जात आहे,हे अत्यंत खेदजनक आहे.मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे.खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही.शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे.

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक,जमीन व्यवहारात आमचा संबंध नाही Read More »

sushma andhare on ashok kharat case

Sushma Andhare on Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare on Ashok Kharat Case : नाशिकच्या अशोक खरात या स्वयंघोषित ज्योतिषाला आज बलात्कार, योन शोषण प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात तपास करत असताना अशोक खरात याच्याकडे तब्बल 58 सेलिब्रिटी आणि हाय प्रोफाईल व्यक्तींचे व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे… अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. विशेष; खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? कारण अशा भामट्या ज्योतिष्यासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत. योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे…? असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Sushma Andhare on Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल Read More »

Rupali Chakankar

बातमी खोटी, मुयरी जगताप प्रकरणात महिला आयोगाचा मोठा खुलासा

Rupali Chakankar : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मयुरी जगताप हगवणे यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले होते तर आता महिला आयोगाने एक पत्र जाहीर करत मयुरी जगताप यांचे आरोप फेटाळले आहे. पुणे जिल्ह्यातील मयत वैष्णवी हगवणे यांची जाऊ मयुरी जगताप हगवणे यांना कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मेघराज जगताप आणि लता जगताप यांनी 6 नोव्हेंबर 2024 रोजी ई-मेलद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 7 नोव्हेंबर 2024 रोजी या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड पोलिस स्टेशन यांना या प्रकरणात कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिले आहे. पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेऊन 19 मे 2025 रोजी बावधन पोलिसांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बावधन पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. त्याचप्रमाणे मयुरी जगताप यांच्या कौटुंबिक छळाच्या प्रकरणातही पोलीसांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्यानुसार त्यांनी तक्रार दाखल करुन पुढील तपास केला. पोलीस तपासाबाबत असमाधानी असल्याचे किंवा इतर कुठल्याही बाबींबाबत त्यानंतर तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबियांनी आयोगाशी संपर्क साधलेला नाही. पौंड पोलिसांनी गुन्हा भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 74,115,352,296, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने 31 जानेवारी 2025 रोजी बावधन पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. मयुरी जगताप यांच्या प्रकरणी 22 मे 2025 रोजी 102/2025 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. तक्रारदारांना याबाबतीत काही आक्षेप असल्यास आणि त्यांनी आयोगाकडे मदत मागितल्यास राज्य महिला आयोग न्यायोचित मदत करण्यास बांधील असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाविरोधात जारी करण्यात येणाऱ्या वृत्ताचे महाराष्ट्र राज्य महिला आयोग खंडन करीत असल्याचेही डॉ. बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी खोटी, मुयरी जगताप प्रकरणात महिला आयोगाचा मोठा खुलासा Read More »