DNA मराठी

Maharashtra Politics

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Rahuri By election : भारत निवडणूक आयोगाने २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार ३ जानेवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेत पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नव्याने पात्र असलेल्या मतदारांची नोंदणी करणे व दोषरहित मतदार यादी तयार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत २९ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल. यात कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार असणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. प्रारूप मतदार यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. यानंतर ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ०१/०१/२०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व भारताचा नागरिक असलेल्या पात्र व्यक्तीस नाव नोंदणी करता येईल. नवीन नाव नोंदणीसाठी ‘नमुना नं. ६’ भरावा लागेल. याशिवाय मतदार यादीतील मयत अथवा दुबार नावे वगळण्यासाठी ‘नमुना नं. ७’, तर एका भागातून दुसऱ्या भागात नाव समाविष्ट करणे किंवा तपशीलात (नाव, वय, लिंग, फोटो इ.) दुरुस्ती करण्यासाठी ‘नमुना नं. ८’ भरता येईल. यासाठी https://voters.eci.gov.in/ हे संकेतस्थळ व ‘Voter Helpline App’ या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा पवार यांची, तर सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी व पुनर्वसन विभागाच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्त्वाचा असून, त्यांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नेमावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या अनुषंगाने २६ डिसेंबर २०२५ रोजी राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी व राजकीय पक्षांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर Read More »

nawab malik

Maharashtra Election: राष्ट्रवादीचे 40 स्टार प्रचारक मैदानात; नवाब मलिकसह ‘या’ नावांचा समावेश

Maharashtra Election : राज्यातील 29 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्या नावाला महायुतीमध्ये भाजपकडून जोरदार विरोध पाहायला मिळत आहे मात्र तरी देखील अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्यावर महापालिका निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांचा नाव स्टार प्रचारक म्हणून घोषित झाल्यानंतर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, शरद पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, ज्येष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रमुख नेते नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे आणि विकास पासलकर आदींचा समावेश आहे.

Maharashtra Election: राष्ट्रवादीचे 40 स्टार प्रचारक मैदानात; नवाब मलिकसह ‘या’ नावांचा समावेश Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : मी हिंदुत्ववादी, ठाकरे बंधू एकत्र पण फरक पडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : राज्यातील राजकारणातील मोठी घडामोड घडली असून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून देखील ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या युतीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले, “शिया आणि युक्रेन एकत्र आल्यासारखे प्रचार केला जात आहे, झेलेन्स्की आणि पुतिन बोलत आहेत, त्यांचे अस्तित्व शोधणारे पक्ष, त्यांचे अस्तित्व गमावलेले पक्ष, ज्यांनी वारंवार भूमिका बदलून स्वतःबद्दल अविश्वास निर्माण केला आहे असे दोन पक्ष एकत्र आले तर काय फरक पडेल? हे दोन्ही पक्ष त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुती बीएमसी निवडणुकीत जिंकेल पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या लोकांनी महायुती सरकारचा विकास पाहिला आहे. मुंबई आमच्यासोबत आहे, मुंबई आमच्यासोबत राहील आणि महायुती बीएमसी निवडणुकीत जिंकेल.” फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे हे खूप निराश व्यक्ती आहेत, म्हणून मला वाटते की त्यांच्या शब्दांना महत्त्व देऊ नये. तसेच मी हिंदुत्ववादी आहे संपूर्ण जगाला माहिती आहे असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज यांनी युतीची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र राहण्यासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला (यूबीटी) फक्त 20 जागा मिळाल्या होत्या, तर मनसेला यश मिळाले नव्हते.

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : मी हिंदुत्ववादी, ठाकरे बंधू एकत्र पण फरक पडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल Read More »

img 20251224 wa0027

Maharashtra Election : ठाकरे बंधू एकत्र अन् काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षासोबत आघाडी जाहीर

Maharashtra Election : शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महानगर पालिका निवडणुकीसाठी युती झाली असून महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेसने देखील मोठा निर्णय घेत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षासोबत आघाडी जाहीर केली आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी माहिती दिली आहे. टिळक भवन येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महादेव जानकर हे बहुजन समाजाचा आश्वासक आवाज आहेत. देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे अशा प्रसंगी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय झाला आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत आघाडीची औपचारिक घोषणा केलेली नव्हती पण सातारा, सांगली तसेच मराठवाडा व विदर्भात एकत्र निवडणुका लढलो आहोत आणि तीच भूमिका आज पुढे घेऊन जात आगामी काळात सोबत राहण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यावेळी म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन काम करत असताना समविचारी पक्षांनी एकत्र असावे या भावनेतून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. काँग्रेसबरोबर रासपची आघाडी ३१ मे रोजीच झाली आहे. राहुल गांधी हे देशातील तरुण, महिला, आदिवासी, गोरगरीब, मागासवर्गीय यांचा आवाज बनून काम करत आहेत. जागा किती मिळणार यापेक्षा आजघडीला संविधान व लोकशाही वाचवण्याची नितांत गरज आहे तसेच सामान्य लोकांना मान सन्मान मिळाला पाहिजे, असे जानकर म्हणाले.. शिवसेना मनसे युतीला शुभेच्छा.. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, त्यांच्या युतीला आमच्या सदिच्छा व शुभेच्छा आहेत, आम्ही जोडणारे आहोत तोडणारे नाही. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढली पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यानुसार पक्षाने निर्णय घेतला आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश मोठं आहे. महायुतीने साम, दाम, दंड, भेद नितीचा खुलेआम वापर केला, सोबतीला प्रशासन व निवडणूक आयोग होता, तरीही काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने व निष्ठेने लढला. अनेक ठिकाणी स्वबळावर लढलो त्याचा फायदा काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत झाला, असेही सपकाळ म्हणाले. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ४१ नगराध्यक्ष निवडून आल्याबद्दल प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ४१ आकड्याच्या आकाराचा पुष्पगुच्छ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिला.

Maharashtra Election : ठाकरे बंधू एकत्र अन् काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ पक्षासोबत आघाडी जाहीर Read More »

maharashtra government

Maharashtra Cabinet Decisions : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास मिळणार मताचा अधिकारी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करून नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व आणि मताचाही अधिकार देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणासह ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रमसाठी देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ निर्णय(संक्षिप्त) ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग) राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग) धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा. (महसूल विभाग) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार. (नगर विकास विभाग)

Maharashtra Cabinet Decisions : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास मिळणार मताचा अधिकारी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय Read More »

rahul kalate

Rahul Kalate : शरद पवारांना मोठा धक्का; राहुल कलाटे भाजपवासी

Rahul Kalate : राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मातब्बर नेते, महापालिकेतील माजी गटनेते व माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राहुल कलाटे यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेवकांनी यापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता, परंतु कलाटे यांच्या प्रवेशाकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “राहुल कलाटे यांच्यासारखा एक चांगला कार्यकर्ता आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करूया.” यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, “शहरातील एक तरुण तडफदार नेतृत्व भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असताना मला आनंदच होत आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपा अबकी बार सव्वाशे पार होईल. या प्रवेशामुळे भाजपा पिंपरी चिंचवड शहराचे मजबुतीकरण होईल. राहुल कलाटे यांचे भाजपामध्ये स्वागत करतो.” पक्ष प्रवेशानंतर राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, कणखर व विकासाभिमुख नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योगदान देता येईल, या विश्वासातूनच हा निर्णय घेतला आहे. लोकांची कामे व्हायला पाहिजेत हीच माझी भूमिका राहिलेली असून, यासाठी मागील 20 वर्षांपासून मी संघर्ष करतोय. लोकांनी कायमच माझ्यावर विश्वास ठेवला आहे. आणि हाच विश्वास मी भाजपा नेतृत्वाकडे सोपवत आहे.” पुढे बोलताना कलाटे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या कष्टातून उभारलेल्या या शहराला देश-विदेशात ओळख मिळवून दिली आहे. मात्र, शहरात काही स्थानिक समस्या अद्यापही प्रलंबित आहेत. या सर्व समस्या सोडवून प्रत्येक नागरिकाला त्याचा न्याय्य हक्क मिळवून देणे आणि सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हेच माझे प्रमुख ध्येय आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी काम करत राहणार!” या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत होणार आहे. राहुल कलाटे यांचा प्रशासकीय अनुभव, व्यापक जनाधार, संघटन कौशल्य आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची कार्यपद्धती यामुळे भाजपाला निश्चितच बळ मिळणार आहे. या प्रवेशामुळे भाजपा शत प्रतिशत कडे वाटचाल करेल असे बोलले जात आहे. शहरातील विरोधी गटातील सर्वात मोठा प्रमुख नेता व आक्रमक चेहरा भाजपामध्ये दाखल झाल्याने भाजपासाठी स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये निर्णायक व सकारात्मक बदल घडणार असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी हा प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, अशी चर्चा शहरभर सुरू आहे.

Rahul Kalate : शरद पवारांना मोठा धक्का; राहुल कलाटे भाजपवासी Read More »

congress

Maharashtra Election: महापालिकेसाठी काँग्रेस ‘तयार’; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Maharashtra Election : राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगर पालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यानुसार राज्यात 15 जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठी घोषणा करत 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेत्यांसोबत देशातील काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस खा.मुकुल वासनीक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन,  खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सुनिल केदार, आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम, आमदार भाई जगताप, अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खा. हुसेन दलवाई, आ. साजिद खान पठाण, कन्हैया कुमार, आमदार जिग्नेश मेवाणी, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आ. मुजफ्फर हुसेन, एम.एम. शेख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

Maharashtra Election: महापालिकेसाठी काँग्रेस ‘तयार’; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर Read More »

election

Rahuri By Election : राहुरीत लवकरच पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय

Rahuri By Election : विधानसभा सदस्य कै. शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ नुसार या मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकाच्या आधारे राबविण्यात येणार आहे. यानुसार, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण २९ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ जानेवारी २०२६ रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान ठेवण्यात आला आहे. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे आवाहन मुख्य  निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Rahuri By Election : राहुरीत लवकरच पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय Read More »

mumbai local

Navi Mumbai Crime : धक्कादायक, धावत्या लोकलमधून विद्यार्थिनीला फेकले

Navi Mumbai Crime : हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेलच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या विकृताने एका विद्यार्थिनीला चक्क धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेल येथे राहणारी विद्यार्थीनि ही आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होती. यावेळी लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या शेख अख्तर नवाज शेख याला डब्यातील महिलांनी जाब विचारला. त्यावर संतप्त झालेल्या आरोपीने दरवाजात उभ्या असलेल्या श्वेता हिला धावत्या लोकलबाहेर ढकलले. हा प्रकार पाहून डब्यातील महिलांनी घाबरून आरडाओरड करत तत्काळ लोकलची चेन खेचली. तसेच काही महिलांनी रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई करत खांदेश्वर रेल्वे स्थानकावर सापळा रचला. लोकल स्थानकात दाखल होताच पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाज शेख याला अटक केली. या घटनेत श्वेता ही थोडक्यात बचावली असली तरी तिच्या डोक्याला, कंबरेला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती विजय तायडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल रेल्वे पोलीस यांनी दिली. तर दुसरीकडे या धक्कादायक घटनेनंतर लेडीज डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Navi Mumbai Crime : धक्कादायक, धावत्या लोकलमधून विद्यार्थिनीला फेकले Read More »

farmers

Kharif Season 2025 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ई-पीक पाहणी नोंदणीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ‘ऑफलाईन’ पाहणीची संधी; असा करा अर्ज

Kharif Season 2025 : राज्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद करू न शकलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांच्या पिकांची ‘ऑफलाईन’ पध्दतीने पाहणी व नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यानुसार, संबंधित शेतकऱ्यांनी २४ डिसेंबर २०२५ पर्यंत आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  महसूल व वन विभागाने १४ डिसेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये आणि जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) डॉ. सुहास दिवसे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी गाव नमुना नं. १२ वर यापूर्वी झालेली नाही, केवळ अशाच शेतकऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे.   अशी असेल कार्यवाहीची पद्धत या प्रक्रियेसाठी ग्रामस्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये मंडळ अधिकारी (अध्यक्ष), ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने ही समिती प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करेल. यावेळी बियाणे व खते खरेदीच्या पावत्यांची तपासणी करणे, तसेच शेजारच्या शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून वस्तुस्थितीदर्शक पंचनामा करण्यात येणार आहे. पीक पाहणीसाठी वेळापत्रक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे: १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२५ पर्यंत.   ग्रामस्तरीय समितीने करावयाची स्थळपाहणी : २५ डिसेंबर २०२५ ते ०७ जानेवारी २०२६.   उपविभागीय समितीकडे अहवाल सादर करणे : ०८ जानेवारी ते १२ जानेवारी २०२६.   जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम अहवाल सादर करणे : १३ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६.   या प्रक्रियेदरम्यान ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी आधीच सातबारा (नमुना १२) वर झाली आहे, त्यात कोणताही बदल किंवा दुरुस्ती केली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील ई-पीक पाहणीपासून वंचित राहिलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kharif Season 2025 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ई-पीक पाहणी नोंदणीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ‘ऑफलाईन’ पाहणीची संधी; असा करा अर्ज Read More »