DNA मराठी

Maharashtra Congress

fb img 1756928636506

Harshwardhan Sapkal: महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

Harshwardhan Sapkal: भारतीय जनता पक्ष मतचोरी करून सत्तेत आला आहे. महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात झाला. ज्या कामठीत मतचोरीची सुरवात झाली त्या चोराला सर्वात आधी धडा शिकवला पाहिजे. वोट चोर, गद्दी छोड,चा पहिला धमाका कामठीत झाला असून तो देशभर पाहोचला आहे. आता या मतचोरांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभर ‘वोट चोर, गद्दी छोड’, मेळाव्याचे आयोजन केले आहे, त्याअंतर्गत महाराष्ट्रात पहिला राज्यव्यापी मेळावा नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घेण्यात आला. या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, काँग्रेस कार्य समितीच्या सदस्य यशोमती ठाकूर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री सुनिल केदार, नसीम खान, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रतिभा धानोरकर, प्रशांत पडोले, नामदेव किरसान, बळवंत वानखेडे, आमदार अभिजित वंजारी, नागपूर ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो लोक उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, कामठीतील मेळावा हा सरकारला इशारा असून लोकशाहीला हात लावाल तर खबरदार. नागपूरमधून 75 वर्षाच्या नेत्यांना खूर्ची खाली करण्याचे आदेश निघाले आहेत, त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि तो दिवस दूर नाही की देशात मध्यावधी निवडणुका होतील आणि शिव, शाहु, फुले व आंबेडकरांच्या विचाराचे नवे सरकार येईल. ‘वोट चोर, गद्दी छोड’ हा काँग्रेसचा नारा असून आता गप्प बसून चालणार नाही. या लढाईत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे सपकाळ म्हणाले. विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपा व रा. स्व. संघावर तोफ डागली, ते म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत प्रत्येक दाम्प्त्याने 3 मुलांना जन्म द्यावा असे सांगतात परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीत एका घरी 56 मुले दाखवण्यात आली आहेत आणि 10 बाय 10 च्या खोलीत 109 मतदार दाखवले आहेत. भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले आहेत. हे भित्रे लोक आहेत, वोट चोरी करून सत्तेत आले आहेत. भाजपाचे लोक एकमेकाला चिमटे घेऊन विचारत होते आपण विजयी झालो का.. कामठीचा सरदार तर यात सर्वात पुढे होता. मतांचा बाजार कामठीतून  सुरू झाला हे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. भाजपाची  सत्ता असल्याने मतचोरांना शिक्षा होणार नाही पण मतदार मात्र या मतचोरांना शिक्षा देणार आहे. महाराष्ट्रातील या मतदारचोरांना धडा शिकवला पाहिजे, जिल्हा परिषद निवडणुकीत मतचोरी करणाऱ्यांना धडा शिकवून त्यांची औकात दाखवा, असे वड्डेवार म्हणाले. विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यावेळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे पण आपला हा अधिकार राहिला आहे का? अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण टाकलेले मत त्याच पक्षाला जाते का, याबाबत मोठी शंका उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांनी मतचोरीवर 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली, त्याची दखल जगभरात घेतली गेली. आज देशभर मतचोरीचा मुद्दा चर्चेत आहे, आता हा लढा जनतेपर्यंत घेऊन जावा लागणार आहे, त्यात सहभागी होऊन राहुल गांधींचे हात बळकट करा, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले. माजी मंत्री नसीन खान यावेळी म्हणाले की, लोकसभेत मविआने घवघवीत यश मिळवले पण पाच महिन्यातच चित्र बदलले, या पाच महिन्यात 45 लाख मतदार घोळ करून वाढवले. मतदानाच्या चार दिवस अगोदरपर्यंत ऑनलाईन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली पण हा आयोग भाजपाच्या इशारऱ्यावर काम करत आहे. राहुल गांधी यांनीही याविरोधात जोरदार लढा उभा केला आहे पण निवडणूक आयोग मात्र समाधानकारक उत्तर देत नाही. आज देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आहे ते वाचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे आणि आगामी निवडणुकीत मतांची चोरी होणार नाही यासाठी सजग रहा, असे नसिम खान म्हणाले. काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुनिल केदार, यशोमती ठाकूर, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मतचोरीच्या मुद्द्यावर भाजपा व निवडणूक आयोगावर तोफ डागत लोकशाही व संविधानावर होत असलेला हल्ला हाणून पाडला पाहिजे असे म्हटले.

Harshwardhan Sapkal: महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप Read More »

एसटी स्थानक परिसरातील काँक्रीटीकरणाचा बोजवारा; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

Maharashtra Congress: राज्यातील विविध एसटी आगार व बसस्थानक परिसरातील खड्ड्यांचे साम्राज्य दूर करण्यासाठी गतवर्षी एसटीच्या वर्धापन दिनी तातडीने काँक्रीटीकरणाचे आदेश देण्यात आले होते. यासाठी लागणारा निधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) एसटीला देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात एमआयडीसीने निधी स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवून निविदा प्रक्रिया पार पाडली आणि एसटीला त्यात कोणताही सहभाग दिला नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. बरगे यांच्या मते, पूर्ण झालेल्या १२६ आगारांपैकी तब्बल ३० टक्के ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पावसामुळे पुन्हा खड्डे व पाणी साचल्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे प्रवासी व कर्मचारी दोघांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गतवर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्यापूर्वी राज्यातील सर्व आगार ‘खड्डेमुक्त’ करण्याचे आदेश दिले होते. तसेच, यासाठी एमआयडीसीकडून ५०० कोटी रुपये देण्यात येतील असे जाहीर करण्यात आले होते. मात्र हा निधी एसटीला वर्ग करण्यात न आल्याने कामावर एसटीचे नियंत्रणच राहिले नाही. परिणामी राज्यातील १९३ आगारांपैकी केवळ १२६ ठिकाणीच काँक्रीटीकरण झाले असून तेही ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप होत आहेत. खड्ड्यांमुळे प्रवाशांना धक्काबुक्की खात, आदळत प्रवास करावा लागत आहे. आवारात साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजार पसरत आहेत. चालकांना गाड्या पार्किंग करताना त्रास होत असून यांत्रिकी कर्मचारी पावसाच्या पाण्यात काम करण्यास भाग पाडले जात आहेत. बरगे यांनी आपल्या पत्रात विचारले आहे की “जाहीर केलेला ५०० कोटींचा निधी एसटीकडे का वर्ग करण्यात आला नाही? एमआयडीसीच्या नियंत्रणाखालील या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला का? राज्यातील लाखो प्रवाशांचा आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या निकृष्ट कामाची जबाबदारी कोण घेणार?” त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणाची शासनस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एसटी स्थानक परिसरातील काँक्रीटीकरणाचा बोजवारा; मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी Read More »

मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा.., हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Harshwardhan Sapkal : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी केली आहे. ते टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतचोरीसंदर्भात ट्वीट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ८ टक्के मतदार वाढले हे आरटीआयमधून उघड झाले आहे. फडणवीसांविरोधात निवडणूक लढलेले काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी ही माहिती मागविली आहे. विशिष्ट मोबाईल नंबरवरून अनेक मतदारांची नोंद केल्याचेही स्पष्ट झालेले आहे. याची शहानिशा करावी असे निवडणूक आयोगाने सांगितले पण शहानिशा केलेली नाही. गुडदे पाटील यांनी न्यायालयात दोन याचिकाही दाखल केलेल्या आहेत. फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेला नाहीत. या मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करावी व चौकशी होईपर्यंत त्यांनी पदावरून दूर रहावे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. सरकारी जाहिरातीत राजमुद्रा गायब करून सेंगोल कसा? भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आज आणीबाणी संदर्भात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत जाहिरातबाजी केली आहे. सरकारी जाहिरातीतून राजमुद्रा गायब असून सेंगोल दाखवला आहे. सेंगोल कशाचे प्रतिक आहे, हे वेगळे सांगायला नको. भाजपाला लोकशाही व संविधान संपवून गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट’ लागू करायचे आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.. काँग्रेस मुख्यपत्र शिदोरीचा आणीबाणी विशेष अंक काँग्रेस पक्षाचे मुख्यपत्र जनमानसाची शिदोरी या मासिकाचा आणीबाणी विशेष अंक काढला आहे. या अंकात इंदिराजी गांधी, पुपुल जयकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दैनिक सामनाचे संपादक व खा. संजय राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ लेखकांनी लेख लिहिले आहेत. या अंकातून आणीबाणी संदर्भातील सत्य लोकांसमोर आणले जाणार असून भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर मिळेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. चांदीच्या ताटात पाहुणचार.. संसद व विधिमंडळ अंदाज समितीतील लोकांनी पाच हजार रुपयांचे शाही भोजन, ५५० रुपये भाड्याच्या चांदीच्या ताटात पाहुणचार झोडला तो धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या अंदाज समितीच्या पैशातून होता का, असा प्रश्न विचारून अंदाज समितीच्या तमाशाचा हा दुसरा वग आहे. शाही पाहुणचार झोडून काटकसर कशी करायची, हे समितीने सांगितले असावे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्यास पैसे नाहीत आणि मेजवाणी झोडण्यासाठी मात्र पैसे आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा.., हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी Read More »

Maharashtra Congress: काँग्रेसमध्ये होणार मोठी कारवाई, ‘या’ आमदारांना बसणार धक्का

Maharashtra Congress:  राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  सर्व राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार? हे लवकरच समजेल.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वात जास्त जागांवर यश आलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आता आत्मविश्वास वाढला असून आगामी विधानसभा निवडणुकीत ते आपले उमेदवार निवडून रिंगणात उतरवू शकतात.  पण सूत्रांच्या माहितीनुसार काही विद्यमान आमदारांचं कामकाज पाहून काँग्रेस पक्ष विधानसभेच्या तिकीट कापण्याची शक्यता आहे. ज्यांचं मतदारसंघात काम चांगलं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. यासाठी आमदारांच्या कामाचा अहवाल जमा केला जाणार आहे. “विधानसभा निवडणुकीत कोणत्याही बदमाशाला तिकीट दिलं जाणार नाही,” असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. “हायकमांडने हा निर्णय घेतला आहे की, कोणत्याही बदमाशांना आता विधानसभेचं तिकीट द्यायचं नाही. काही लोकं व्यापारासाठी येतात. त्यामुळे अशा कोणत्याही बदमाशांना या पक्षात स्थान दिलं जाणार नाही. तशी भूमिका काँग्रेसची आहे. आम्ही कोणालाही अभय दिलं नाही. ज्यांची चूक समोर आली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. चुकीला माफी नाही,” अशी भूमिका काँग्रेस हायकमांडची असल्याचे नाना पटोले यांनी केले आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे  तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले असून उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांची भेट घेतली. यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश असेल.

Maharashtra Congress: काँग्रेसमध्ये होणार मोठी कारवाई, ‘या’ आमदारांना बसणार धक्का Read More »