DNA मराठी

DNA Marathi News

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश

Pratap Sarnaik : प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्न करीत असते. त्यानुसार इवे ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून 5150 ईलेक्ट्रीक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महामंडळाला ई- बसेसचा पुरवठा करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात कंपनी प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बस पुरवठ्याबाबत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कंपनीचे के. व्ही प्रदीप आदी उपस्थित होते. बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षीत असल्याचे सूचीत करीत मंत्री सरनाईक म्हणाले, कंपनीने दिलेल्या बसेसचा चालनीय तोटा लक्षात घेता, राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठी (viability gap funding) चा प्रस्ताव पाठविण्यात यावा. कंपनीने आतापर्यंत 220 बसेसचा पुरवठा केला आहे. उर्वरित पुरवठा सुधारित करारानुसार करण्यासाठी कंपनीने नियोजन करावे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, भाडेतत्वावर कंपनीने 5150 ईलेक्ट्रीक बसेस पुरवठा करण्याचा करार करण्यात आला. त्यापैकी 220 बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये 12 मीटर व 9 मीटर लांबीच्या बसेस आहेत. महामंडळाने विभागनिहाय नवीन खाते तयार करून इलेक्ट्रीक बसच्या उत्पन्नामधून कंपनीला बिलांची रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार 60 कोटी रूपये कंपनीला देण्यात आले आहे. उर्वरित 40 कोटी रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामंडळाला 12 मीटर बस चालविताना प्रति किलोमीटर 12 रूपये आणि 9 मीटर बस चालविताना 16 रूपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून पुढील काही वर्षात 3191 कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. तोट्याची रक्कम राज्य शासनाकडून देण्याचे मान्य केल्यास बस पुरवठ्याचा हा करार पूर्णत्वास जावू शकतो. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्समंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश Read More »

वैष्णवी हगवणे प्रकरण, अनिल कस्पटे यांच्या मागणीनंतर सरकारी वकील म्हणून आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती

Vaishnavi Hagavane: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी तिचे वडील अनिल कस्पटे यांनी पुढाकार घेत, या गुन्ह्याची प्रभावी व निष्पक्षपणे न्यायालयात मांडणी व्हावी, यासाठी सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता एस. व्ही. मोरे देसाई यांनी गुरुवारी (29 मे) अधिकृत आदेश जारी करून कावेडिया यांची या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती. तिच्या मृत्यूमागील कारणे व संभाव्य आरोपींची भूमिका उघड व्हावी, यासाठी तिचे वडील अनिल कस्पटे सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. आर. आर. कावेडिया हे अनुभवी व निष्णात वकील असून त्यांनी याआधी अनेक गुन्हेगारी व सामाजिक प्रकरणांत सरकारी बाजू प्रभावीपणे मांडली आहे. त्यामुळे वैष्णवीच्या कुटुंबीयांना या नियुक्तीमुळे न्याय मिळविण्याच्या लढ्याला नवे बळ मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वैष्णवीच्या नातेवाइकांनी केली आहे. आता सरकारी वकील म्हणून कावेडिया यांची नियुक्ती झाल्याने या खटल्याच्या न्यायालयीन कार्यवाहीस अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. कावेडिया यांचा अनुभव लक्षात घेता, या प्रकरणात न्याय मिळण्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वाची ठरणार आहे..

वैष्णवी हगवणे प्रकरण, अनिल कस्पटे यांच्या मागणीनंतर सरकारी वकील म्हणून आर. आर. कावेडिया यांची नियुक्ती Read More »

वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ अन् टोल फ्री वाहन; शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde: आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आरोग्य तपासणी गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. नोडल अधिकारी नेमणार यासोबतच गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल, पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल, यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ अन् टोल फ्री वाहन; शिंदेंची मोठी घोषणा Read More »

मस्कने ट्रम्पला का सोडले? मैत्री तुटण्यामागील खरे कारण जाणून घ्या

Elon Musk : टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलोन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारशी असलेले महत्त्वाचे संबंध तोडले आहेत. 28 मे रोजी मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) मधून राजीनामा दिला. या निर्णयामुळे वॉशिंग्टनमध्ये खळबळ उडाली आहेच, पण मस्क आणि ट्रम्प यांच्यातील संबंधांमधील दरीही उघड झाली आहे. DOGE हा एक विभाग होता जो सरकारी खर्च कमी करण्यासाठी आणि अप्रभावी योजना कमी करण्यासाठी तयार करण्यात आला होता. एलोन मस्क त्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक होता आणि त्याने सरकारी क्षेत्रात तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सूचना केल्या होत्या. पण आता त्यांना वाटते की ट्रम्पचे नवीन विधेयक – वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट – हे DOGE च्या मूळ उद्देशाच्या विरुद्ध आहे. मस्क यांना हे विधेयक का आवडले नाही? ट्रम्प सरकारने प्रस्तावित केलेल्या वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्टवर मस्क यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “हे विधेयक सरकारी तूट कमी करणार नाही, तर ती आणखी वाढवेल. ते मोठे किंवा सुंदर असू शकते, परंतु दोन्हीही नाही.” या विधानाने हे स्पष्ट केले की मस्क हे विधेयक सरकारी संसाधनांचा अपव्यय मानतात. या विधेयकात 2017 मधील कर कपात पुढील 10 वर्षांसाठी वाढवणे, सीमा सुरक्षेसाठी अधिक खर्च करणे, आरोग्य सहाय्यावरील कठोर नियम आणि स्वच्छ ऊर्जेशी संबंधित कर लाभांमध्ये कपात करणे यांचा समावेश आहे. मस्क यांचा असा विश्वास आहे की ही सर्व पावले भविष्यातील आर्थिक स्थिरतेसाठी धोकादायक आहेत. व्हाईट हाऊस आणि रिपब्लिकन पक्षातील फरक प्रतिनिधी सभागृहात हे विधेयक अत्यंत कमी बहुमताने (215-214) मंजूर झाले. रिपब्लिकन पक्षातीलच फिस्कल हॉक्स नावाच्या गटाने त्याला विरोध केला. तथापि, ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये सांगितले की, “मी त्यातील काही भागांवर खूश नाही, परंतु पुढे काय होते ते पाहू.” त्याच वेळी, व्हाईट हाऊसचा दावा आहे की हे विधेयक 1.6 ट्रिलियन डॉलर्सची बचत करेल आणि आर्थिक वाढ 5.2% ने वाढवेल. असे असूनही, अनेक अर्थतज्ज्ञांचा असा अंदाज आहे की हे विधेयक पुढील 10 वर्षांत अमेरिकेतील तूट 4 ट्रिलियन डॉलर्सने वाढवू शकते. DOGE वर काय परिणाम झाला? एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील DOGE विभाग सरकारी खर्चात सुधारणा करण्यासाठी काम करत असे. पण मस्कच्या मते, वन बिग ब्युटीफुल बिल कायद्यात ज्या योजनांना प्राधान्य दिले गेले आहे, त्या कार्यक्षमतेच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहेत. म्हणूनच त्यांनी या पदापासून स्वतःला दूर केले. एलोन मस्कचा हा निर्णय दर्शवितो की धोरण आणि विश्वासातील फरक कोणत्याही राजकीय भागीदारीला तोडू शकतात, मग ती कितीही उंच असली तरी. आता सर्वांच्या नजरा सिनेटवर आहेत, जिथे या विधेयकावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

मस्कने ट्रम्पला का सोडले? मैत्री तुटण्यामागील खरे कारण जाणून घ्या Read More »

जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था पण आजही आदिवासी महिलेला रस्त्यावर मूल जन्माला घालावे लागतात, रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली खंत

Rohini Khadse : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावातील आदिवासी पाड्यातील एका महिलेने आरोग्य यंत्रणा नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे. यावरून सर्व स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, जपानला मागे टाकत आपला देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे अशा बातम्या कालपरवा पासून आपण मीडियामध्ये ऐकत आहोत. मला वाटत नाही की जपानमध्ये कधी आरोग्य यंत्रणेअभावी एखाद्या महिलेने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे. पण आपल्या भारतात ते घडले आहे तेही आपल्या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावात एक महिलेने आरोग्य यंत्रणाच नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे असे त्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, आमच्या जळगाव जिल्ह्यात चार चार मंत्री आहेत. पण आरोग्य यंत्रणा तितकी सक्षम नाही. त्यामुळे ही जी घटना घडली आहे त्यासाठी प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे, प्रत्येकांसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. पुरेशी आरोग्य यंत्रणा नसल्याने एका लाडक्या बहिणीने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे ही शोकांतिका आहे असं त्या म्हणाल्या.

जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था पण आजही आदिवासी महिलेला रस्त्यावर मूल जन्माला घालावे लागतात, रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली खंत Read More »

राजकारणात कायमस्वरूपी मैत्री किंवा वैर नसतं, ‘जगताप-नागवडे’ पुन्हा एकत्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित

Rahul Jagtap : राजकीय व्याख्येत ‘काळ सगळ्यांचा असतो, पण वेळ कुणाचीही नसते’, याच उक्तीची प्रचिती आज पुन्हा एकदा आली आहे. एकेकाळचे कट्टर विरोधक, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप आणि सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे दोघे आता एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. राजकारणातील हे नवे समीकरण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. विधानसभा निवडणुकीत नागवडे यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत जगताप यांनी बंडखोरी केली होती. या बंडखोरीमुळे नागवडे पराभूत झाले आणि भाजपचे विक्रम पाचपुते आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर जगताप यांना राष्ट्रवादीकडून निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, नागवडे कुटुंबीयांनीदेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, राजकीय समीकरणांमध्ये झालेल्या हालचालींमुळे दोघांनीही पुन्हा एकत्र यायचे ठरवले आहे. आज (,27 मे) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन, नंतर तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत जगताप व नागवडे यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. याच बैठकीत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला. येत्या काही तासांत ते अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. या राजकीय घडामोडींचा सर्वाधिक फटका भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांना बसण्याची शक्यता आहे. कारण श्रीगोंदा मतदारसंघात पुन्हा एकदा जगताप-नागवडे यांच्या एकत्रित प्रभावामुळे भाजपला मोठं आव्हान निर्माण होणार आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं, कालचे शत्रू आजचे मित्र ठरतात, हेच या घडामोडींनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

राजकारणात कायमस्वरूपी मैत्री किंवा वैर नसतं, ‘जगताप-नागवडे’ पुन्हा एकत्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित Read More »

iPhone16 Pro Max वर प्रचंड डिस्काउंट; होणार बंपर बचत; असा घ्या फायदा

iPhone 16 Pro Max : तुम्ही देखील iPhone 16 Pro Max खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात बंपर डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही आता अगदी कमी किमतीमध्ये iPhone 16 Pro Max घरी आणू शकतात. सध्या विजय सेल्समध्ये अँपल डेज सेल सुरू आहे ज्यामध्ये आयफोन 16 प्रो मॅक्सवर मोठी सूट देण्यात येत आहे. सध्या तुम्ही हे डिव्हाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून 18,700 रुपयांपेक्षा जास्त सवलतीत खरेदी करू शकता. गेल्या वर्षी अँपलने हा हँडसेट भारतात 1,44,900 रुपयांच्या किमतीत सादर केला होता. या फोनमध्ये उत्तम डिस्प्ले, हाय लेव्हल कॅमेरे देण्यात आले आहे. याच बरोबर या फोनमध्ये अँपल इंटेलिजेंसचा सपोर्ट देखील उपलब्ध देण्यात आला आहे. iPhone 16 Pro Max डिस्काउंट ऑफर Apple iPhone 16 Pro Max सध्या विजय सेल्स वेबसाइटवर फक्त 1,30,650 रुपयांना विकला जात आहे. या सेलमध्ये या फोनवर 14,250 रुपयांची फ्लॅट सूट मिळत आहे. याशिवाय, तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून या हाय-एंड डिव्हाइसवर 4,500 रुपयांची अतिरिक्त सूट किंवा ICICI आणि Axis बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांद्वारे 3,00 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. याशिवाय, फोनवर 21 महिन्यांसाठी 6,250 रुपयांपासून सुरू होणारा EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. iPhone 16 Pro Max फीचर्स आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये 2868 x 1320 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.9-इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. नियमित आयफोन मॉडेलच्या तुलनेत, हे डिव्हाइस 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या प्रीमियम फ्लॅगशिप हँडसेटमध्ये Apple ची A18 Pro चिप आहे, जी 8GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये अँपल इंटेलिजेंस देखील दिसत आहे. iPhone 16 Pro Max कॅमेरा स्पेसिफिकेशन आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा आहे, ज्यामध्ये 48 एमपीचा प्राथमिक कॅमेरा आहे ज्यामध्ये 12 एमपीचा पेरिस्कोप टेलिफोटो आहे ज्यामध्ये 5x ऑप्टिकल झूम आहे आणि 48 एमपीचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. या डिव्हाइसमध्ये 4,685mAh ची मोठी बॅटरी देखील आहे जी 25W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग देते.

iPhone16 Pro Max वर प्रचंड डिस्काउंट; होणार बंपर बचत; असा घ्या फायदा Read More »

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा; CM फडणविसांचे आदेश

Monsoon 2025 : राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणी साठी, पिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीष महाजन, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, क्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री निलेश राणे उपस्थित होते. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. ‘सचेत’ प्रणालीवरून 19 कोटी मोबाईल लघु संदेशाद्वरे पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश देण्यात येत आहेत. त्यावरून 19 कोटी 22 लाख मोबाईल लघु संदेश पाठविण्यात आले. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (Decision support system) ने सुसज्ज करण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशी चार पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याचे सेठी यांनी सांगितले. राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून, पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयातील जलसाठा अकरा टीएमसीने वाढल्याची माहिती दिली. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यात टँकरच्या संख्येत काही अंशी घट झाली आहे, तथापि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अजूनही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली.

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा; CM फडणविसांचे आदेश Read More »

बातमी खोटी, मुयरी जगताप प्रकरणात महिला आयोगाचा मोठा खुलासा

Rupali Chakankar : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मयुरी जगताप हगवणे यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले होते तर आता महिला आयोगाने एक पत्र जाहीर करत मयुरी जगताप यांचे आरोप फेटाळले आहे. पुणे जिल्ह्यातील मयत वैष्णवी हगवणे यांची जाऊ मयुरी जगताप हगवणे यांना कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मेघराज जगताप आणि लता जगताप यांनी 6 नोव्हेंबर 2024 रोजी ई-मेलद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाखल केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर 7 नोव्हेंबर 2024 रोजी या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड पोलिस स्टेशन यांना या प्रकरणात कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिले आहे. पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेऊन 19 मे 2025 रोजी बावधन पोलिसांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बावधन पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. त्याचप्रमाणे मयुरी जगताप यांच्या कौटुंबिक छळाच्या प्रकरणातही पोलीसांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्यानुसार त्यांनी तक्रार दाखल करुन पुढील तपास केला. पोलीस तपासाबाबत असमाधानी असल्याचे किंवा इतर कुठल्याही बाबींबाबत त्यानंतर तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबियांनी आयोगाशी संपर्क साधलेला नाही. पौंड पोलिसांनी गुन्हा भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 74,115,352,296, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने 31 जानेवारी 2025 रोजी बावधन पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. मयुरी जगताप यांच्या प्रकरणी 22 मे 2025 रोजी 102/2025 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. तक्रारदारांना याबाबतीत काही आक्षेप असल्यास आणि त्यांनी आयोगाकडे मदत मागितल्यास राज्य महिला आयोग न्यायोचित मदत करण्यास बांधील असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाविरोधात जारी करण्यात येणाऱ्या वृत्ताचे महाराष्ट्र राज्य महिला आयोग खंडन करीत असल्याचेही डॉ. बैनाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी खोटी, मुयरी जगताप प्रकरणात महिला आयोगाचा मोठा खुलासा Read More »

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Harshwardhan Sapkal: राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्तांना एकरी 20 हजार रुपये मदत तातडीने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा केले आहे. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की सरकारने कशाचीही पर्वा न करता शेतकऱ्याला मदत दिली आहे. आताचे सरकार मात्र शेतकऱ्याला मदत करण्याच्या विचाराचे नाही. केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, कोरडी आश्वासने देऊन चालणार नाही, शेतक-यांना तातडीने मदत पोहचवली पाहिजे. खरिप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी अद्याप जाहीर केलेली नाही, कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. सरकारचे खरिपाचे काहीच नियोजन नाही याकडेही लक्ष वेधून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते द्यावीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. मुसळधार पावसाने भाजपा युती सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत. कालवे फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार तसेच मुंबई तुंबल्याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी बाहेर पडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईत जागोजागी पाणी साचले, सर्व व्यवस्था कोलमडली. भुयारी मेट्रो मुंबईत शक्य नसल्याचा एमएमआरडीएचा अहवाल असतानाही काही लोकांच्या हट्टासाठी हा प्रकल्प राबविला त्याचे परिणाम आज दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची कत्तल करून मेट्रोचा अट्टाहास पूर्ण केला आहे. सत्ताधारी पक्षाचा कथित विकास एका पावसानेच उघडा पाडल्यानंतरही हे लोक आधीच्या सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. 25 वर्ष भाजपा शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेत सत्तेत होती, एकनाथ शिंदे सातत्याने नगर विकास खात्याचे मंत्री आहेत मग याकाळात भाजपा व एकनाथ शिंदे यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून सरकारने आरोप प्रत्यारोपाचा खेळ सोडून आत्मपरिक्षण करावे आणि जनतेला मदत करावी. महाराष्ट्र नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना राज्याचे मंत्रिमंडळ मात्र अमित शाह यांची खुशामत करण्यात मग्न आहे. आपले मंत्रीपद शाबूत रहावे यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री धडपड करत आहेत. अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारात दोन सिलिंडर मोफत देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, अशा वल्गणा केल्या, त्याचा आता त्यांना विसर पडलेला दिसत आहे. अमित शाह महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटावर एक शब्दही बोलले नाहीत. आता दिल्लीला जाण्यापूर्वी तरी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून जावी कारण राज्यातील सरकार अमित शाह यांच्या शब्दाशिवाय कामच करत नाही अशी कोपरखळीही हर्षवर्धन सपकाळ यांनी मारली. या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते द्या; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी Read More »