DNA मराठी

Ahilyanagar Railway

Tanpure

Prajakt Tanpure : … तर मुंबई-दिल्लीतही आंदोलनाचा इशारा; त्या प्रकरणात आमदार प्राजक्त तनपुरे भडकले

Prajakt Tanpure : प्रस्तावित राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित भूमिका निश्चित करण्यासाठी २७ जुलै सोमवार रोजी उंबरे येथील साई मंगल कार्यालयात सर्व बाधित शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य आ. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत रेल्वेमार्गाविरोधात व्यापक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक गावातून पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन प्रतिनिधी निवडून कृती समिती स्थापन करण्याची सूचना आ.प्राजक्त तनपुरे यांनी बैठकीत केली. बैठकीत मार्गदर्शन करताना आ. तनपुरे म्हणाले की, प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार असून, काहींच्या शेतीचे दोन तुकडे होणार आहेत. या परिसरात कोणतीही मोठी औद्योगिक वसाहत किंवा रोजगारनिर्मितीचा प्रकल्प नसताना केवळ रेल्वेमार्गासाठी सुपीक शेतीचे नुकसान करणे योग्य ठरणार नाही. विकासासाठी आवश्यक आणि लोकहिताचा प्रकल्प असता, तर त्याला विरोध केला नसता; मात्र शेतकऱ्यांचे नुकसान करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या विषयावर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यासाठी शिष्टमंडळ नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आवश्यकतेनुसार मुंबई तसेच दिल्ली येथेही तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येक गावातून पक्षीय भेद बाजूला ठेवून सक्षम प्रतिनिधी निवडून कृती समिती स्थापन करण्याचे आवाहन करताना तनपुरे यांनी या समितीत शेतकरी, वकील, पत्रकार, सोशल मीडियाचे जाणकार तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश करण्याची सूचना केली. आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी गावागावांत जनजागृती मोहीम राबविणे, माध्यमांच्या माध्यमातून विषय मांडणे आणि सोशल मीडियावर व्यापक जनआंदोलन उभे करण्याचे आवाहनही त्यांनी केले. “जमिनी संपादनासाठी कोणताही करार करू नका. प्रकल्पाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करू नका. शेतकऱ्यांच्या हक्कांचा हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल. गरज पडल्यास जेलभरो आंदोलन करण्यासही आम्ही तयार आहोत,” असे ठाम प्रतिपादन आ. तनपुरे यांनी केले. बैठकीत उपस्थित शेतकरी आणि विविध गावांतील प्रतिनिधींनीही प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापक लोकआंदोलन उभारण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या शेवटी प्रस्तावित रेल्वेमार्गाविरोधात कृती समिती स्थापन करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला. प्रत्येक गावातून प्रतिनिधींची नावे तातडीने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, पुढील आंदोलनाची दिशा कृती समितीच्या माध्यमातून निश्चित केली जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी बैठकीला बैठकीस तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे, सुनील अडसूरे,विजय बानकर, राजेंद्र ढोकणे, भागवत देशमुख, डॉ.राजेंद्र बानकर,संचालक डॉ.माऊली दरंदले, धनंजय, वसंत कुसळकर, व्ही. एम. दरंदले, एस.बी.शेटे, शेतकरी संघटनेचे नेते अनिल निमसे, रामेश्वर कुसळकर यांच्यासह विविध गावांतील शेतकरी, ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेल्वे प्रकल्प उभारणीसाठी आपल्या परिसरात कोणत्याही शेतकऱ्यांनी रेल्वे लाईन उभारण्यासाठी लागणारे सामान ठेवण्यासाठी ठेकेदारास आपल्या जागा शेती कोणत्याही आर्थिक स्वरूपात देऊ नये.तसेच शेतकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठीशी उभे रहा.ज्यावेळी जेल मध्ये जायची वेळ त्यावेळी सर्वात आधी पुढे प्राजक्त तनपुरे राहिलं.एखादा मोठा उद्योग आला असता तर आम्ही विरोध केला नसता पण शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उधवस्त करू यासाठी रेल्वे कृती समितीचे नेतृत्व करणार आहे असं आ.प्राजक्त तनपुरे म्हणाले.

Prajakt Tanpure : … तर मुंबई-दिल्लीतही आंदोलनाचा इशारा; त्या प्रकरणात आमदार प्राजक्त तनपुरे भडकले Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: आजपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार; खासदार लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा

Nilesh Lanke: पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील लाखो प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा १७ जून पासून सुरू होत आहे. या रेल्वे सेवेचा शुभारंभ पुणे येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून, त्याचवेळी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी याबाबत खासदार नीलेश लंके यांना पत्राद्वारे माहिती दिली असून, मध्य रेल्वेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे. पुणे–साईनगर शिर्डी या थेट रेल्वे सेवेच्या प्रारंभामुळे पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा पर्याय उपलब्ध होणार असून, दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शैक्षणिक कारणांसाठी ये-जा करणारे विद्यार्थी तसेच व्यावसायिक वर्गाला याचा मोठा लाभ मिळणार आहे. विशेषतः साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या नव्या रेल्वे सेवेच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील व्यापार, उद्योग, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे संपर्क अधिक सक्षम झाल्याने या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवे परिमाण प्राप्त होणार असल्याचे मानले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला पुण्याशी अधिक प्रभावी रेल्वे संपर्क उपलब्ध व्हावा तसेच धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना जोडणाऱ्या रेल्वे सेवांचा विस्तार व्हावा, यासाठी खासदार नीलेश लंके यांनी संसदेत आणि विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडे त्यांनी वेळोवेळी या मार्गावरील रेल्वे सेवेची आवश्यकता अधोरेखित केली होती. याशिवाय संसदेतील चर्चांपासून ते रेल्वे समित्यांच्या बैठका, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चासत्रे आणि रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनांमधून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नवीन रेल्वे सेवा, प्रवासी सुविधांमध्ये वाढ आणि तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या मार्गांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी सातत्याने मांडली होती. या सर्व प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा प्रारंभ हा अहिल्यानगर जिल्ह्याच्या रेल्वे विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रवाशांची मागणी पूर्ण होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, या रेल्वे सेवेचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.

Nilesh Lanke: आजपासून पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस धावणार; खासदार लंके यांच्या हस्ते हिरवा झेंडा Read More »