DNA मराठी

Sunetra Pawar Oath : शपथविधी आणि सत्तेचा वेग; संवेदनांवर मात करणारी राजकीय गणितं

sunetra pawar

Sunetra Pawar Oath : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच एका महिलेनं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा केवळ एक प्रशासकीय वा घटनात्मक घटना नव्हे, तर पवार कुटुंबाच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. राज्याला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याचा हा क्षण अभिमानास्पद मानावा असा असतानाच, या शपथविधीभोवती निर्माण झालेली अस्वस्थता आणि प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत.

कारण हा शपथविधी अशा काळात पार पडला, की ज्यावेळी महाराष्ट्र अजूनही सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, पण कधीही मुख्यमंत्रीपद न भूषवलेले आणि सर्वसामान्य माणसांच्या मनात मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठे घर केलेले अजित पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरलेला नाही. सत्ता आणि पद यांपेक्षा लोकांच्या भावविश्वात खोलवर रुजलेलं एक व्यक्तिमत्त्व हरपल्याची जाणीव अजूनही ताजी आहे.

अजित पवार हे नाव केवळ राजकीय नव्हतं; ते थेटपणा, स्पष्टता आणि निर्णयक्षमतेचं प्रतीक होतं. अनेक सर्वसामान्य नागरिक असे होते, ज्यांनी कधी अजित पवार यांना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, कधी त्यांच्याशी थेट संबंधही आला नव्हता.

तरीही त्यांच्या जाण्याने ते हळवे झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो प्रसंग खिशात पैसे नसलेल्या एका रस्त्यावरील माणसाने वृत्तपत्रातील अजित पवार यांच्या छायाचित्राला फुलं वाहणं हा केवळ भावनिक क्षण नव्हता, तर राजकारण आणि सामान्य माणूस यांच्यातील नात्याचं वास्तव दर्शन घडवणारा क्षण होता.

अशा पार्श्वभूमीवर, त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच पवार कुटुंबातील सदस्यांनी मुंबई गाठून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं, हे घटनात्मकदृष्ट्या योग्य असलं तरी सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर प्रश्न निर्माण करणारं ठरलं. भारताची, विशेषतः महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही केवळ सत्ता-समीकरणांवर उभी नाही; ती भावनिक आहे, संवेदनशील आहे आणि काही अंशी अध्यात्मिकही आहे.

दुःख, शोक आणि अवकाश या गोष्टी इथे सार्वजनिक जीवनाचाही भाग ठरतात. या शपथविधीमागे कारणं अनेक असू शकतात. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पक्षातील नेतृत्वाची पोकळी निर्माण होऊ नये, काही नेत्यांना पक्ष हातातून निसटतो की काय अशी भीती वाटत असावी, किंवा यामागे मोठ्या राजकीय सत्तासमीकरणांचाही दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजकारण पोकळी सहन करत नाही, हे वास्तव आहे; मात्र सत्ता भरताना संवेदनांचा विचार कितपत केला गेला, हा प्रश्न उरतोच.

हा शपथविधी कायदेशीरदृष्ट्या बरोबर आहे, तरी नैतिक आणि सामाजिक पातळीवर तो अनेक वर्षं लोकांच्या मनात प्रश्न विचारत राहील. “घाई कशाची होती?”, थोडा काळ थांबता आलं नसतं का? आणि सत्ता महत्त्वाची की स्मृती? हे प्रश्न सहज पुढे येतात.

लोकशाहीत सत्ता ही अंतिम नसते. ती लोकांच्या विश्वासावर उभी असते. आणि हा विश्वास केवळ निर्णयांनी नव्हे, तर निर्णय घेण्याच्या वेळेनेही जोपासला जातो. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी इतिहासात नोंदला जाईलच, पण तो महाराष्ट्राच्या राजकारणात संवेदनशीलतेच्या कसोटीवर मोजला जाणारा एक संदर्भबिंदू म्हणूनही दीर्घकाळ लक्षात राहील, यात शंका नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *