DNA मराठी

Sunetra Pawar: राष्ट्रवादीत बंडाचे संकेत? सुनेत्रा पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळे पक्षात चर्चेला उधाण

sunetra pawar dcm

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पडद्यामागे मोठे राजकीय नाट्य रंगले असून पक्षांतर्गत वादाचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्षांना झुकते माप देण्याच्या मुद्द्यावरून पक्षात आता स्पष्टपणे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. या अंतर्गत संघर्षामुळे सुनेत्रा पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक खळबळजनक पत्र धाडले आहे. 28 जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कोणताही अधिकृत पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी आग्रही विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. घटनेतील बदलांमुळे अधिकारांच्या वाटपावरून हा वाद विकोपाला गेल्याचे समजते. या वादावर पडदा टाकण्यासाठी दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली व स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, या खुलाशानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे समाधान झाले नसल्याची सूत्रांची माहिती आहे. पत्रावरून उद्भवलेला हा कायदेशीर आणि राजकीय तिढा सोडवण्यासाठी सध्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या आणि दिग्गज नेत्यांच्या तातडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार दिल्लीत असून भाजप श्रेष्ठींच्या भेटीगाठी घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

ऐन राजकीय धामधुमीत राष्ट्रवादीतील हा कलह नेमके कोणते वळण घेतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *