Dnamarathi.com

Sujay Vikhe Patil :  खासदार डॉ. सुजय विखे पाटील आज शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे साखर वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाज, बोधेगाव यांनी त्यांची भेट घेऊन सकल मराठा समाज बाधवांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे हा मुद्दा लोकसभेत मांडून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी निवेदन दिले. खासदार विखेंनी त्यांचे निवेदन स्वीकारून सकारात्मक संवाद साधला.

यावेळी मराठा आरक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात यापूर्वीही नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मी सकारात्मक भूमिका मांडली आहे. आमचं समर्थन प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बाजूने राहिले असून मराठा बांधवांच्या पाठीमागे आम्ही सदैव खंबीरपणे उभे आहोत.

पालकमंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व खासदार म्हणून मी यापूर्वीही मराठा समाजाची भूमिका स्पष्ट मांडली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

शेवगाव तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई यांच्या माध्यमातून आजवर कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिलेला नाही व इथून पुढेही निरनिराळ्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे मत मांडून आपण माझ्यावर जो विश्वास दाखवून मतदान केलं, या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही.

 विशेष म्हणजे याची प्रचिती आपल्याला विविध विकासकामांच्या माध्यमातून वेळोवेळी आलीच आहे असे खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केले. आज बोधेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या साखर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. 

खासदार विखे पुढे म्हणाले, बोधेगाव गावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. यापुढे देखील भरीव निधी उपलब्ध करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे स्पष्ट केले.

दरम्यान २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून याच पार्श्वभूमीवर साखर व चणाडाळ वाटपाचे नियोजन चालू आहे असे सांगून २२ जानेवारीला आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत असे मत मांडले. 

सर्व लाभधारकांनी या साखरेतून दोन लाडू बनवावे आणि श्रीरामाच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवावेत असे देखील आवाहन खासदार सुजय विखे यांनी उपस्थितांना केले.

यावेळी ताराभाऊ लोंढे, बापूसो पाटेकर, नितीन भाऊ काकडे, रजाक शेख, बाबा सावळेकर, बाळासो कोळगे, महादेव घोरतळे, मयूर हुंडेकरी, बाळासाहेब कोळगे, संजय खेडकर, भगवान मिसाळ, बाळासाहेब डोंगरे, रामकाका केसभर, अमोल सागडे आदी मान्यवरांसह भाजपाचे विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *